उदगीर येथे २९ डिसेंबरपासून राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 

उदगीर येथे २९ डिसेंबरपासून राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

 

§  राज्यभरातून ८०० स्पर्धक होणार सहभागी

§  ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

लातूर, दि. 19 (जिमाका): युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या वतीने १२ ते १६ जानेवारी या कालावधीत 'राष्ट्रीय युवा महोत्सव' आयोजित करण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्याचे प्रातिनिधिक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव उदगीर येथे २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल (जिल्हा परिषद  मैदान) येथे या महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.

केंद्र शासनाच्यावतीने १२ ते १६ जानेवारी, २०२४ या कालावधीत पुणे येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सन २०२३-२४ या वर्षातील राज्यस्तर युवा महोत्सव आयोजनाची संधी लातूर जिल्ह्यास उपलब्ध करुन दिलेली असून आयोजन समितीच्यावतिने 'राज्यस्तर युवा महोत्सव'  २९ ते ३१ डिसेंबर, २०२३ या कालावधीत उदगीर शहरामध्ये आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे.

या महोत्सवात जवळपास १३ समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व फोटोग्राफी, महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञानातून तृणधान्य वाढीसाठी विकास व सामाज्यासाठी विज्ञान या संकल्पनेवर आधारीत असावी. हस्तकला, वस्त्रोद्योग, अग्रो प्रोडक्ट अशा प्रकारामध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या आठ विभागातून सुमारे ८०० कलाकार सहभागी होतील. महोत्सवातील विविध बाबींच्या परीक्षणासाठी राज्यभरातून तज्ञ कलावंतांना पाचारण करण्यात आलेले आहे. 

जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतिने महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समिती गठीत केलेली असून समितीच्यावतिने शहर व परिसरातील कला क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांना निमंत्रीत करुन महोत्सवाचे नेटके आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आयोजन समितीने महोत्सवाचा लोगो, थीम सॉंग. नाविन्यपूर्ण बाबी केलेल्या आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने उदगीर शहरातील सर्व नागरीकांना २९, ३० व ३१ डिसेंबर या कालावधीत लोककलेची मेजवाणी उपलब्ध होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजन समितीच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.


****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत