दीपावलीमध्ये एस.टी. महामंडळाच्या लातूर विभागाला 22.26 कोटीचे उत्पन्न · प्रवाशांनी महामंडळावर दाखविला विश्वास
विशेष वृत्त
दीपावलीमध्ये एस.टी. महामंडळाच्या
लातूर विभागाला 22.26 कोटीचे उत्पन्न
· प्रवाशांनी महामंडळावर दाखविला विश्वास
लातूर, दि. 01 (जिमाका) : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली लाल परी दिवाळी सुट्ट्यांच्या काळात हाऊसफुल्ल होती. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असून 8 ते 27 नोव्हेंबर 2023 या दिपावली जादा वाहतूकीच्या कालावधीमध्ये लातूर विभागाने तब्बल 22.26 कोटी रुपयांची कमाई केली.
प्रतिवर्षी दिवाळी सणाला शाळा, महाविद्यालयांना सुटटी असते, तर नौकरदार तसेच शिक्षणासाठी मोठ्या शहरात असणाऱ्यांना आपल्या गावाकडे जाण्याची ओढ असते. योग्य दरामध्ये सुरक्षित प्रवास घडविणाऱ्या एसटीला यावेळी प्रवाशांकडून पसंती मिळाली. यंदाच्या दिवाळीमध्ये एसटीच्या लातूर विभागातर्फे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे दिवाळीत एसटी सुसाट धावल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडली. 8 ते 27 नोव्हेंबर या कालावधीमध्ये एसटीच्या लातूर विभागाच्या बसेसनी 38 लाख 48 हजार 554 किलोमीटर अंतर कापले, तर या काळात 22.26 कोटी रुपयांची कमाई केली.
असे आहे प्रत्येक आगाराचे उत्पन्न-
लातूर आगार : 6 कोटी 32 लाख 84 हजार 440.
उदगीर आगर : 5 कोटी 15 लाख 86 हजार 420.
अहमदपूर आगार : 3 कोटी 70 लाख 55 हजार 556.
निलंगा आगार : 3 कोटी 90 लाख 42 हजार 855.
औसा आगर : 3 कोटी 16 लाख 27 हजार 662.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे चांगली कामगिरी : अश्वजीत जानराव
दिवाळी वाहतूकीच्या अनुषंगाने कमीत कमी गाड्या कार्यशाळेमध्ये त्घेवून जास्तीत जास्त गाड्यांचा प्रवाशी वाहतुकीसाठी वापर होण्यासाठी विभागातील सर्व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक काम केले. प्रवाशासाठी जास्त प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांची सोय झाली आणि विभागाच्या उत्पन्नातही चांगल्या प्रकारे वाढ झाली, असे एसटी महामंडळाच्या लातूर विभागाचे नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी सांगितले.
*****
Comments
Post a Comment