रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा;रासायनिक खतांसाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर, दि. १५ : पश्चिम आशियाई देशांतील सद्यस्थिती आणि जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र व राज्य शासनाने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. त्यानुसार रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानुसार, राज्य शासनाने कृषी विभागामार्फत विविध उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असून, जागतिक बाजारपेठेतील खतांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत आहे. ही परिस्थिती विचारात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यामुळे केवळ जमिनीची सुपीकता टिकणार नाही, तर उत्पादन खर्च कमी होऊन विषमुक्त अन्ननिर्मितीला चालना मिळेल.
ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करण्याचे आवाहन
भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि खतांचे वाटप पारदर्शक व योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. या नियोजनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी 'ॲग्रीस्टॅक' या प्रणालीवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. या नोंदणीमुळे खतांचा संतुलित वापर आणि शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. रासायनिक खतांना पर्याय म्हणून जैविक खते, हिरवळीची खते आणि सेंद्रिय खतांच्या वापरावर भर द्यावा. खतांच्या उपलब्धतेबाबत किंवा तांत्रिक अडचणींबाबत शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी बदलत्या जागतिक परिस्थितीचा विचार करून आणि शासनाच्या धोरणांना प्रतिसाद देऊन नैसर्गिक शेतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.*****
Comments
Post a Comment