साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत १९ मे रोजी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत
१९ मे रोजी जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन
· शासकीय योजनांची मिळणार सविस्तर माहिती
लातूर, दि. १४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे लातूर जिल्हा कार्यालय, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाजातील १२ पोटजातींमधील बांधवांसाठी १९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातील शासकीय मुलांचे वसतिगृह अभ्यासिका हॉल होणार आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाजाच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने या विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध वैयक्तिक आणि सामूहिक लाभ योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच महामंडळामार्फत मिळणारे कर्ज, शैक्षणिक सवलती आणि रोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मातंग समाजातील युवक-युवती आणि गरजू लाभार्थ्यांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment