मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान

मच्छिमारांना साधनांच्या खरेदीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत शासकीय अनुदान लातूर, दि. १४ : मच्छिमारीसाठी लागणाऱ्या साधनांच्या किमतीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने, गरीब मच्छिमारांना आपला व्यवसाय किफायतशीरपणे करता यावा, या उद्देशाने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सहकारी संस्थांच्या सभासदांना आणि वैयक्तिक क्रियाशील मच्छिमारांना मासेमारी साधनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार असून, लातूर येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. या योजनेमध्ये तयार मासेमारी जाळीसाठी २४ हजार रुपये प्रकल्प किंमत निश्चित करण्यात आली असून, ३० किलो जाळीसाठी अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच नौका खरेदीसाठी लाकडी नौकेकरिता ६० हजार, स्टील नौकेसाठी ३० हजार, तर फायबर नौकेसाठी १ लाख २० हजार रुपयांची प्रकल्प मर्यादा ठरवण्यात आली असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के आणि अराखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के शासकीय अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचा सभासद किंवा वैयक्तिक क्रियाशील मच्छिमार असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्जासोबत प्रकल्प अहवाल, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, छायाचित्र, बँकेचे विवरणपत्र आणि खरेदीची जीएसटी पावती सादर करणे अनिवार्य आहे. जर लाभार्थी बँक कर्जाद्वारे किंवा स्वनिधीतून योजनेचा लाभ घेणार असेल, तर संबंधित बँकेचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे. कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधित लाभार्थी अपात्र ठरविण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. तरी पात्र मच्छिमारांनी लवकरात लवकर आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन