लातूर, दि. १३ : लातूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर
महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मे महिन्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत
बेकायदेशीररीत्या वाळू, दगड आणि मुरूम यांची वाहतूक करणारी एकूण ४ वाहने जप्त करून त्यांच्यावर
दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे तहसीलदार तथा कार्यकारी
दंडाधिकारी सौदागर तांदळे यांनी दिली आहे.
या मोहिमेदरम्यान एकूण ३ हायवा आणि १
टिप्पर या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एच-२४ बीडब्ल्यू-७७७३ या हायवा वाहनातून ४ ब्रास वाळूची अवैध वाहतूक केली जात
होती. याप्रकरणी संबंधिताकडून ३ लाख १५ हजार ६२० रुपये इतका दंड
शासन खाती जमा करण्यात आला आहे. तसेच एमएच-४२ टी-०७७५ या हायवा वाहनातून ५ ब्रास मुरूम नेला जात असताना कारवाई
करण्यात असून याप्रकरणी २ लाख २९ हजार ७७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एमएच-२२ एन-१२५१ या टिप्परवर ३ ब्रास दगडाच्या अवैध वाहतुकीसाठी कारवाई करण्यात आली असून, सध्या या दंडात्मक वसुलीची
प्रक्रिया सुरू आहे. तसेच केए-२८ सी- ७३६७ या हायवा वाहनावर ४ ब्रास वाळूच्या वाहतुकीसाठी कारवाई
करण्यात आली असून, या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाही देखील प्रगतीपथावर आहे. यापुढेही
तालुक्यातील अशा अवैध प्रकारांवर महसूल विभागामार्फत कारवाई केली जाणार आहे, असे
तहसील कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment