शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नवीन लिंक कार्यान्वित; 'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज भरणे अनिवार्य
*वृत्त क्र. : 385* *दिनांक :12 जून,2026*
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नवीन लिंक कार्यान्वित;
'स्वाधार' योजनेसाठीही वसतिगृहाचा अर्ज भरणे अनिवार्य
लातूर, दि. १२ (जिमाका): जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी आता जुन्या वेबपोर्टलमध्ये बदल करण्यात आला असून, नवीन वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची १४ व मुलींची १२ अशी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये लातूर शहरात मुलांचे ६ तर मुलींचे ४, औसा, निलंगा, उदगीर, देवणी, आणि चाकूर येथे प्रत्येकी मुला-मुलींचे १, अहमदपूर येथे प्रत्येकी २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह आहे. इयत्ता ८ वी, ११ वी, बिगर व्यावसायिक पदवी/पदविका (प्रथम वर्ष), पदव्युत्तर (प्रथम वर्ष) आणि थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र आहेत.
पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या नवीन ऑनलाईन लिंकचा वापर करून आपले अर्ज सादर करावेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून कनिष्ठ महाविद्यालय व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मुदत १५ जुलै २०२६ पर्यंत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी महत्त्वाची अट
शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना, जागांअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. वसतिगृह प्रवेशासाठी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग होणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशाचा ऑनलाईन अर्ज भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी स्वतंत्र अर्ज सादर करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध असणार नाही व त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शासनाने दिलेल्या नवीन वेब लिंकचा वापर करून विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत. तसेच, कोणतीही अडचण आल्यास स्थानिक गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment