हिंदू खाटीक समाजासाठी सुवर्णसंधी; विविध कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंदू खाटीक समाजासाठी सुवर्णसंधी;
विविध कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. १२ : हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांची उपकंपनी) लातूर जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज आणि अनुदान योजना राबविण्यात येणार असून, या योजनांसाठी मुख्यालयाकडून उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
या अंतर्गत अनुदान योजनेसाठी ०५, बीजभांडवल योजनेसाठी ०५, थेट कर्ज योजनेसाठी ०६, एनएसएफडीसी टर्म लोनसाठी ०५, एनएसएफडीसी सूक्ष्म पतपुरवठ्यासाठी ०१ आणि एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजनेसाठी ०१ असे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे. अर्जासोबत जातीचा व उत्पन्नाचा मूळ दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, रहिवासी प्रमाणपत्र, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, आधार लिंक असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, उद्यम आधार, टी.सी. व मार्क मेमोसारखी शैक्षणिक कागदपत्रे, संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण व अनुभव प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना (शॉप ॲक्ट) आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे अनिवार्य आहे.
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, जुनी डालडा फॅक्टरी, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कर्ज आणि अनुदान योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, लातूरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment