मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जळकोट येथे एकदिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत जळकोट येथे एकदिवसीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात लातूर, दि. ११ : राज्य शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार लातूर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आणि जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, आधुनिक मत्स्यजाळी व बोटी, पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, मत्स्य हाताळणी, विपणन आणि शीतसाखळी व्यवस्थापन या विषयावरील एकदिवसीय जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे, मत्स्यपालकांमध्ये आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, कौशल्यवृद्धी करणे आणि वैज्ञानिक मत्स्यपालनाबाबत जनजागृती निर्माण करणे हा प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ आर. यादव उपस्थित होते. या कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील विविध मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे सदस्य, प्रगतशील मत्स्यपालक तसेच संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून एकूण ६३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण सत्रादरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी व विषयतज्ज्ञांनी आधुनिक मत्स्यपालनातील नवीन संधी, शाश्वत उत्पादनवाढ आणि मत्स्य उद्योगासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे कसा घ्यावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रामध्ये उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सोमनाथ आर. यादव यांनी बायोफ्लॉक व रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करताना आधुनिक मत्स्यपालनातील वैज्ञानिक पद्धती, उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण आणि उद्योजकतेच्या संधी स्पष्ट केल्या. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अमोल एस. मुसने यांनी लॉट आधारित जलगुणवत्ता निरीक्षण प्रणाली, सौरऊर्जेवर चालणारे एअरेटर्स (सोलर एअरेटर्स) आणि आधुनिक जलगुणवत्ता व्यवस्थापन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मत्स्य उत्पादनात होणारी वाढ, उत्पादन खर्चात होणारी बचत व पर्यावरणपूरक मत्स्यसंवर्धनास मिळणारी चालना याविषयी माहिती दिली. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सय्यद हमजा यांनी आधुनिक मत्स्यजाळी व नौकांचा वापर, माशांचे वैज्ञानिक संकलन, शीतसाखळी व्यवस्थापन, काढणीनंतर होणारे उत्पादन नुकसान कमी करण्याच्या आधुनिक पद्धती आणि परिणामकारक विपणन व्यवस्थापन यावर प्रकाश टाकत दर्जेदार मत्स्य उत्पादन ग्राहकांपर्यंत सुरक्षित व ताज्या स्वरूपात पोहोचवण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच डॉ. शरद आर. सुरनर यांनी पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन (केज कल्चर) या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना जलाशयांचा अधिक कार्यक्षम वापर, उत्पादन क्षमतेत वाढ, मत्स्य उद्योजकतेच्या नव्या संधी आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत उपस्थितांना माहिती दिली. संवादात्मक सत्रात प्रशिक्षणार्थींनी विविध तांत्रिक विषयांवर प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले आणि समारोपप्रसंगी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लातूर येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालय, जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांनी मोलाचे योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास