लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
· ऑगस्टपर्यंत
कारखाना सुरु करण्याचा प्रयत्न
· स्थानिकांना रोजगार, लातूरच्या विकासाला गती मिळणार
लातूर, दि. 23 (जिमाका): येथील रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपर्यंत हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून याठिकाणी 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती केली जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे सांगितले. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार गोविंद केंद्रे, मध्य रेल्वेचे आर. के. मंगला, शिशिर दत्ता यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाने लातूर येथे रेल्वे बोगी कारखाना उभारण्यासाठी 600 कोटी
रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी सातत्याने
पाठपुरावा सुरु आहे. यासाठी मागविण्यात आलेल्या निविदा उघडल्यानंतर भारतीय रेल्वेची
आरव्हीएनएल कंपनी आणि रशियातील एका कंपनीसोबत कराराची प्रक्रिया सुरु आहे. ही
प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्ष बोगी निर्मितीला येत्या ऑगस्टपर्यंत सुरुवात
होईल, अशी अपेक्षा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन 400 वंदे भारत
रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली असून यापैकी 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती लातूर
येथील कारखान्यात होईल. आवश्यकता भासल्यास आणखी 80 रेल्वे निर्मितीचे कामही लातूर
येथील कारखान्यात केले जाईल, असे श्री. दानवे यावेळी म्हणाले.
केद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्वप्रथम भारतीय
रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत
आढावा घेतला. रेल्वेचे अधिकारी राजकुमार मंगला, अभय मिश्रा यांनी प्रकल्पाविषयी
माहिती दिली. यावेळी प्रकल्पाबाबत पीपीटी व व्हिडीओद्वारे सादरीकरण करण्यात आले.
त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांनी मराठवाडा बोगी निर्मिती कारखान्याची
प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्टोअर वार्ड, शेल शॉप, फिनिशिंग शॉप, पेंट
शॉप आणि बोगी शॉप आदी विभागांना भेटी देवून माहिती जाणून घेतली.
Comments
Post a Comment