दर्जेदार कृषि निविष्ठांच्या वितरणावर भरारी पथके ठेवणार संनियंत्रण
दर्जेदार कृषि निविष्ठांच्या वितरणावर
भरारी पथके ठेवणार संनियंत्रण
· तालुका, जिल्हा आणि विभागस्तरावर पथके स्थापन
लातूर, दि. 13 (जिमाका) : विभागातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठा वेळेत व योग्य किंमतीत उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाचा गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. निविष्ठांचे वितरण योग्यरितिने होण्यास व त्याचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन केलेली आहेत. खरीप हंगामातील कृषि निविष्ठांचे तपासणी आणि संनियंत्रण या भरारी पथकांमार्फत केले जाणार आहे.
तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) पी.व्ही. भोर हे विभागीय भरारी पथकांचे प्रमुख आहेत, तर विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस.एच.मोरे हे या पथकाचे सदस्य सचिव आहेत. तसेच कृषि अधिकारी (निविष्ठा पुरवठाचे कामकाज पाहणारे) ए. एन. तिडके यांच्यासह वैधमापनशास्त्र विभागाचे प्रतिनिधी या पथकाचे सदस्य असतील.
शेतकऱ्यांची निविष्ठांसाठी अडवणूक होणार नाही, कृषि निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास संबंधित उत्पादक, विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास असल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
*****
Comments
Post a Comment