मुरुड येथील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यावर भर - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

                                          मुरुड येथील समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाधान शिबिराच्या माध्यमातून

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यावर भर

-        जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

·       शिबिरात प्राप्त तक्रारी, निवेदनांविषयी नियमित आढावा घेणार

·       जिल्ह्यातील रस्ते 1 मे पर्यंत अतिक्रमणमुक्त करण्याचे उद्दिष्ट

·       गरीब शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम सुरु


लातूर, दि. 13 (जिमाका) :
 जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या अडचणी, तक्रारी सोडविण्याला प्रशासनाचे प्राधान्य आहे. यासाठी जिल्ह्यात विविध महसूल मंडळांमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज दिली. मुरुड येथे आयोजित यावर्षीच्या पहिल्या समाधान शिबिरात ते बोलत होते.

लातूरचे उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गोसावी, तहसीलदार स्वप्नील पवार, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर, मुरुडच्या सरपंच अमृता नाडे, उपसरपंच हनमंत नागटिळक, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वैभव सापसोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.


प्रशासकीय विभागांकडे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्यासाठी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्राप्त निवेदने, तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा नियमितपणे आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना वेळेत खरीप पीक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या जिल्हास्तरीय बैठकीत निर्देश दिले जातील. तसेच विविध शासकीय विभागांकडे लाभार्थ्यांच्या प्रलंबित अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे ते यावेळी म्हणाले.

नकाशातील रस्ते 1 मे पर्यंत होणार अतिक्रमणमुक्त


जिल्ह्यात नकाशामध्ये असलेले सर्वप्रकारचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या 1 मेपर्यंत सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून हे रस्ते वापरत आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच वहिवाटीखाली असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमणही काढण्याची कार्यवाही केली जाणार असून रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शेतकरी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. तसेच जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण सुरु असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

कृषि विभागामार्फत प्रत्येक गावात किमान पाच शेततळे निर्माण करा


मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेतून प्रत्येक गावात किमान पाच शेततळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केल्या. शेततळ्यांमुळे फळबाग, भाजीपाला आणि इतर पिकांना संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण होणार असून यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आनंदाचा शिधा, निराधार योजना प्रमाणपत्राचे वितरण


राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात येत आहे. मुरुड येथील समाधान शिबिरातही प्रातिनिधिक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वितरीत करण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मंजुरी मिळालेल्या लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

विविध विभागांच्या योजनांविषयी मार्गदर्शन


समाधान शिबिराला उपस्थित शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांना यावेळी शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. उपविभागीय कृषि अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत पीक प्रात्याक्षिके, खरीप हंगामातील गट प्रात्याक्षिके, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प आदी योजनांची माहिती दिली. तसेच गट विकास अधिकारी श्री. भालके यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या आवास योजना, रोहयो, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत आदी योजनांची माहिती दिली. महावितरणमार्फत सौर कृषिपंप योजनेची माहिती देण्यात आली.

मुरुड परिसरातील विविध गावांमधून आलेल्या शेतकरी, नागरिकांच्या अडचणी, तक्रारी यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ऐकून घेतल्या. तसेच संबंधित विभागांकडून या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेवून त्यांना आवश्यक सूचना केल्या. यावेळी नागरिकांनी शेतरस्ते, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पशुवैद्यकीय सुविधा, कृषिपंप जोडणी, पीएम किसान योजना, ग्रामीण पाणी पुरवठा आदी योजनांशी निगडीत तक्रारी मांडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी श्री. देसाई यांनी केले, ग्रामपंचायत सदस्य महेश कणसे यांनी आभार मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा