लातूर जिल्ह्यात "हर घर नर्सरी" उपक्रमासाठी शिवार भटकंती ; 12 पोती बीज संकलन

 

लातूर जिल्ह्यात "हर घर नर्सरी"  उपक्रमासाठी शिवार भटकंती ; 12 पोती बीज संकलन

 

दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतन करण्यासाठी बीज संकलन मोहीम

 


लातूर दि. 15 ( जिमाका ) विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात " हर घर नर्सरी " हा उपक्रम राबविला जात आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मध्ये नर्सरीचे नियोजन करण्यात आले असून  त्यासाठी काल रेणापूर तालुक्यातील दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्यात जाऊन 12 पोती विविध वृक्षाचे बीज संकलन केले.

  ही बीज संकलन मोहिम लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवराई लातूर, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिया सहभागाने पार पडली. यामध्ये प्रामुख्याने दुर्मिळ वृक्षांच्या प्रजातीचे बी संकलन करण्यात आले. हा बीज संकलन उपक्रम रेणापूर, लातूर ,चाकूर तालुक्याच्या सीमेवर दव्हेली ,जानवळ ,वडवळ , झरी या परिसरात राबविला गेला. बीज संकलनामध्ये मासरोहिणी, आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस ,गावरान आंब्याच्या कोया अश्या अनेक दुर्मिळ वृक्षांच्या बी संकलन करण्यात आले. बारा पोते बी संकलन करण्यात आले. या मोहिमेत जिल्हा नगरपंचायत प्रशासन विभागाचे सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नगरपरिषद रेणापूर न.प.चे मुख्याधिकारी मंगेश शिंदे,  सह्याद्री देवराई लातूरचे समन्वयक सुपर्ण जगताप, द संस्कृती फाऊंडेशनचे पदाधिकारी ज्येष्ठ पत्रकार अभय मिरजकर, सह्याद्री देवराई व संस्कृती फाउंडेशन चे  शिवशंकर चापुले, जिल्हा परिषद कृषी मोहीम अधिकारी गोपाळ शेरखाने, आयुर्वेदाचार्य डॉ दत्तात्रय दगडगावे, राम माने, प्रतिक्षा मोरे , विद्यार्थी, गावकरी, कर्मचारी हे सहभागी होते.

  "हर घर नर्सरी " या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरी  पन्नास रोपटे, शासकीय कार्यालयास पाच हजार रोपटे तयार केले जाणार आहेत.  लातूर जिल्हा अवृक्षाच्छादित जिल्ह्यात सर्वात खालच्या स्थानावर आहे. राज्यातल्या सर्वाधिक  बाष्पीभवन होणाऱ्या जिल्ह्यात लातूरची गणना होते. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी, विविध सेवाभावी संस्थानी पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आग्रही आहेत.

****





Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा