सामाजिक न्याय विभागाच्या योजना सुलभ करण्याचा प्रयत्न -अविनाश देवसटवार

 

सामाजिक न्याय विभागाच्या योजना सुलभ करण्याचा प्रयत्न

-अविनाश देवसटवार

लातूर, दि. 31 (जिमाका) :* भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यासारख्या योजनांमधील अडथळे कमी करून अशा योजनांचा लाभ सहजरीत्या मिळावा, यासाठी या योजना सुलभ करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी सांगितले.

दयानंद विज्ञान महाविदयालयाच्या सभागृहात भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देवसटवार बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, दयानंद विज्ञान महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, दयानंद कला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद वाणिज्य महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम पवार, उपप्राचार्य डॉ. माळी, श्री आयटी सोल्युशनचे संचालक आकाश बागडे, यावेळी उपस्थित होते.

भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे श्री. देवसटवार यांनी सांगितले.

‘समान संधी केंद्राचे’ बळकटीकरण महत्वाचे आहे. समाज कल्याण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यातील महाविद्यालयात समान संधी केंद्र निर्माण झाली आहेत. तसेच या समान संधी केंद्रामार्फत आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत योजना पोहचवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचे असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनीही कार्यशाळेत मार्गदर्शन केले. आपण स्वतः शिष्यवृत्त्ती योजनेचा लाभार्थी असून  शिष्यवृत्ती मुळे आयुष्यात मोठे बदल झाले आणि नामांकीत महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापर्यंत पोहचता आले, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माहितीबाबतचा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यास कार्यशाळेमुळे मदत होणार असल्याचे सांगितले.

सदर कार्यशाळेत श्री आयटी सोल्युशनचे आकाश बागडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत ऑनलाईन सादरीकरण केले. कार्यशाळेस लातूर शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, समान संधी केंद्राचे समन्वयक, तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्रीराम शिंदे यांनी केले, नागेश जाधव यांनी आभार मानले.






 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु