शेतकऱ्यांना थेट घरा पर्यंत लाभ पोहचवणारी "शासन आपल्या दारी " हा अभिनव उपक्रम - आ.अभिमन्यू पवार
शेतकऱ्यांना थेट घरा पर्यंत लाभ पोहचवणारी
"शासन आपल्या दारी " हा अभिनव उपक्रम
- आ.अभिमन्यू पवार
औसा तालुक्यातील 7009 लोकांना मिळाला लाभ
औसा तालुक्यातील शेत रस्ते पॅटर्न आता राज्याने स्विकारला
प्रशासनाकडून उभे केलेल्या 60 स्टॉलवर
विविध योजनांच्या माहितीसाठी लाभार्थ्यांची रिघ
लातूर दि.22 ( जिमाका)
शासनाच्या विविध विभागाच्या वतीने ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांचा लाभ तालुका
स्तरावर जाऊन एकाच छताखाली एकाच दिवशी देण्याचा " शासन आपल्या दारी "हा अभिनव
उपक्रम असून आज औसा तालुक्यातील 7009 लाभार्थ्यांना विविध प्रकारचे लाभ देण्यात आले.
अशा लोककल्याणकारी योजनाचा लाभ देण्याचे शासनाचे कौतुकास्पद पाऊल असल्याची भावना आ.
अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.
"शासन आपल्या दारी " ह्या उपक्रमाचा
जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम आज औसा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी. पी. होते. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी
अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी
दत्तात्रय गवसाने, जलसंपदा विभागा चे अधिक्षक अभियंता अभिजित म्हात्रे, विविध विभागाचे
जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते.
लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात घरकुल आज दिले गेले.
शेतकऱ्यांसाठी घरा एवढेचं महत्वाचे जनावरांचे गोठे आहेत, पुढील काळात अधिकाधिक गोठे
दिले जावेत असे सांगून ज्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळाल्या त्यांनी मोठ्या प्रमाणात
फळबाग लागवड करावी आणि शासनाच्या योजनेचा आपल्या आर्थिक उन्नतीसाठी फायदा करून घ्यावा
असा संदेश आ. अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.
आज मोठ्या प्रमाणात " शासन आपल्या दारी
" या कार्यक्रमासाठी शेतकरी आले आहेत म्हणून मुद्दाम सांगतो, गेल्यावर्षी जसा गोगलगायीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव
झाला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने त्यासाठी मदतही केली. यावर्षी तशी वेळ
येऊ नये म्हणून जिल्हा कृषी विभागाने गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना
केल्या आहेत. त्याची घडी पुस्तक काढली आहे. ती तुमच्या गावी घेऊन जा, त्याचा प्रचार
प्रसार करा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. औसा तालुक्याचे आमदार
अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून औसा तालुक्यात मोठया प्रमाणात शेत रस्ते झाले आहेत.
वर्षानुवर्षे रखडलेले हे काम अत्यंत महत्वाचे होते. शेतीच्या उन्नतीसाठी रस्ते अत्यंत
महत्वाचे आहेत. औसा तालुक्याने पूर्ण राज्यात शेतरस्त्याचा औसा पॅटर्न केला. आता लातूर
जिल्ह्यातही शेत रस्त्याचे हे काम जिल्हा प्रशासनाने पूर्णत्वास नेले असल्याची माहिती
जिल्हाधिकारी यांनी दिली. आज औसा येथे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेल्या "शासन
आपल्या दारी" हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार असल्याचे सांगून
अधिकाधिक लोकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन केले.
लोकांना कोणताही त्रास न होता, त्यांना लागणारी
महत्वाची कागदपत्र, विविध योजनाचे अनुदान, विविध कामाचे कार्यारंभ एकाच ठिकाणी मिळावेत
म्हणून " शासन आपल्या दारी " हा उपक्रम आहे. या उपक्रमाला लोकांचा हा मोठा
प्रतिसाद पाहून हा उपक्रम किती महत्वाची आहे हे लक्षात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आम्ही अधिकाधिक लोकांना लाभ
देण्याचा प्रयत्न करत असून ह्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो लोकांना लाभ होणार असल्याचेही
गोयल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी
"शासन आपल्या दारी " या उपक्रमाचा शासनाचा उद्देश सविस्तरपणे आपल्या प्रास्तविकात
सांगितला.
विविध
दालनाचे उदघाटन आणि पाहणी
मुख्य कार्यक्रमापूर्वी
आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते शासनाच्या विविध दालनाचे उदघाटन करण्यात आले. विविध
60 दालनांची पाहणीही यावेळी त्यांनी केली.
लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया
दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य शासनाने बालसंगोपन
अनुदान सुरु केले असून 1100 रुपये दर महा मिळणारे अनुदान आता 2200 रुपये मिळत आहे. औसा तालुक्यातील लखनगाव येथील ज्योती
विजयकुमार कदम यांना दोन अपत्य असून त्यांना या कार्यक्रमात बाल संगोपन अनुदान मंजुरीचे
पत्र देण्यात आले. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता , त्या म्हणाल्या, माझ्या
परिस्थितीमुळे मी मुलांना फारसं शिकवू शकले नसते पण आता हा आधार माझ्यासाठी मोठा आहे.
मी माझ्या लेकरांना शिकवून मोठं करणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
शिवली येथील शेतकरी गोपाळ काळे यांचा शेतीपूरक दूधाचा
व्यवसाय आहे, त्यांना जनावरांच्या चाऱ्यासाठी चाप कट्टर देण्यात आले. यामुळे माझा वेळ
वाचणार असून माझ्या व्यवसाय वृद्धीसाठी हे गरजेचे होते अशी भावना त्यांनी बोलून दाखविली.
खरोसा येथील शेतकरी बलभीम बिराजदार यांना ठिबक सिंचन
अनुदान मंजूर झाले.यामुळे पिकाला पाणी देणे सुलभ होणार असून पिकाचा उतारा वाढण्यासाठी
मदत आणि पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन कमी पाण्यात अधिक भिजवा होणार असल्यामुळे त्यांनी
आनंद व्यक्त केला.
Comments
Post a Comment