शंखी गोगलगाय या वर्षी रोखू या …!!

 

शंखी गोगलगाय या वर्षी रोखू या …!!

शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या येणाऱ्या हंगामात सोयाबीन आणि इतर पिकांवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील कृषी विद्यावेत्ता विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.डॉ. अरुण गुडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही माहिती दिली आहे.

शंखी गोगलगाय ही किड निशाचर असून रात्रीच्या वेळी सोयाबीन पिकाच्या रोपावस्थेत पिकांचे नुकसान करते.

एकात्मिक नियंत्रण  :-

  1. उन्हाळ्यात करावयाची कामे :

• उन्हाळ्यात खोल नांगरट करून घ्यावी जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हाच्या मदतीने नष्ट होतील.

2.      प्रतिबंधात्मक उपाययोजना :

•सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) 05 सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा.

•सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड 2.5% (स्नेलकिल) या औषधाच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे आणि संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) 5 ते 7 फुट अंतरावर एक गोळी टाकावी.

• स्नेलकिल हे औषध गोगलगायींना आकर्षून घेते आणि गोगलगायीने या गोळीला चाटल्यानंतर 4 ते 5 तासांनी गोगलगायीच्या आतला स्त्राव बाहेर येऊन ती नियंत्रणात येते.

3.      सोयाबीनच्या उगवणीनंतर :

प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजूने 5 फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात.

4.     सोयाबीन रोपावस्थेत असताना :

          रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा.

          सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान ढिगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

          गोगलगाय नियंत्रणासाठी सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक.  

          सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक रोगाचे व्यवस्थापन :

          हा रोग विषाणूजन्ये असून या रोगाची सुरुवात रोगट बियाण्याद्वारे होते आणि पुढील प्रसार ( एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत ) पांढऱ्या माशीमुळे होतो.

       रोगाची लक्षणे :

सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात.

• फुले आणि शेंगा कमी लागतात.

• शेंगा पिवळ्या पडून दाना भरत नाही.

• उपाययोजना :

1.         बिगर हंगामी सोयाबीनची लागवड टाळावी.

2.         सोयाबीनची लागवड बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीने करावी.

3.         वेळोवेळी पिकाचे किड व रोगासाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे.

4.        पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून येताच ती उपटून टाकावीत आणि शेताबाहेर खड्डा करून त्यात गाडून टाकावीत.

5.         सोयाबीन पिकात पिवळ्या कलरचे चिकट सापळे एकरी 8 ते 10 याप्रमाणे लावावेत.

6.         रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिकावर लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून थायोमिथोक्झाम 25% हे किटकनाशक 40 ग्रॅम प्रति एकरी फवारावे. 

          तूर पिकातील मर व फायटोप्थोरा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन :  

          पेरणीपूर्वी किंवा पेरणी करताना घ्यावयाची काळजी :

1.   पिक फेरपालट करणे आवश्यक आहे.

2.   कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या जाती जशा BDN – 711, BDN – 716, आणि गोदावरी या आधुनिक जातीचा 

वापर करावा.

3.  पेरणीपूर्वी कार्बोक्झीन 37.5 + थायरम 37.5 (व्हिटाव्हॅक्स पावर) 04 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे पहिली  

    बीजप्रक्रिया तर पेरणीच्या दिवशी बायोमिक्स / ट्रायकोडर्मा 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणे दुसरी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

          जुलै / ऑगस्ट महिन्यात घ्यावयाची काळजी :

1.         तूर पिकात जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात ज्यावेळी जमिनीत चांगला ओलावा असेल तेव्हा ट्रायकोडर्मा 04 किलो किंवा बायोमिक्स 04 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यातून ड्रेंचींग (आळवणी) द्यावी.

          सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात घ्यावयाची काळजी (सोयाबीनच्या काढणीनंतर) :

1.तूर पिकात खोडावर फायटोप्थोरा ब्लाईटचे राखेरी कलरचे ठिपके दिसताच मिटॅलॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% (रिडोमिल गोल्ड) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी घ्यावी.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या माहितीचा उपयोग करून घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.                              


-  जिल्हा माहिती कार्यालय,लातूर

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा