मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून लातूर जिल्ह्यातील
भाविक अयोध्या धाम तीर्थ यात्रेसाठी रवाना
· जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी
लातूर, दि. 14 : राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक आज लातूर येथून रेल्वेने अयोध्या धाम येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी रवाना झाले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तीर्थ यात्रेला सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तीर्थ दर्शन यात्रेला जाणाऱ्या भाविकांसा पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे, सहकारी संस्था सहायक निबंधक श्री. गडेकर, आयआरसीटीसीचे गुरुराज सोना यावेळी उपस्थित होते.
साठ वर्षांवरील नागरिकांना विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली आहे. लातूर जिल्ह्यातून या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज या योजनेतून जवळपास 800 भाविक अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहेत. सहा दिवसांची ही तीर्थ दर्शन यात्रा 16 ऑक्टोबर रोजी अयोध्या येथे पोहचणार आहे. त्याठिकाणी दर्शन व एक दिवस मुक्काम करून 17 ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासाला निघतील. या भाविकांना वातानुकुलीत रेल्वेतून प्रवास, भोजन, निवास आणि दर्शन व्यवस्था पुरविण्यात येत आहे. भाविकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, शासकीय कर्मचारी सोबत राहणार आहेत.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेमुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनाची संधी मिळाली असून सर्वजण अतिशय आंनदी वातावरणात या यात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेत सहभागी प्रत्येकाची काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. तसेच तीर्थ दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनावतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी तीर्थ दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच या भाविकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमुळे आपल्याला रामलल्लाच्या दर्शनाची संधी लाभल्याचा आनंद यावेळी भाविकांनी व्यक्त केला. तसेच शासनाचे व प्रशासनाचे आभार मानले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात भाविकांना घेवून जाणारी रेल्वे अयोध्या धामकडे रवाना झाली.
*******
Comments
Post a Comment