विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सर्वांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४


सर्वांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रतिनिधी यांची बैठक


लातूर, दि. १६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत त्या बोलत होत्या.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर निगराणी पथके, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसारच काम करणे बंधनकारक आहे. प्रचारासाठी आवश्यक बाबींची पूर्वपरवानगी घेवूनच प्रचार सभा, वाहने याद्वारे प्रचार केला जावा, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.


जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. प्रचार सभांच्या ठिकाणी भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक बाबीची पूर्वपरवानगी घेवूनच अशा सभांचे आयोजन केले जावे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.


प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, तसेच नव्याने निर्माण झालेल्या मतदान केंद्रांची माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेवून मतदान केंद्र, प्रचारासाठी आवश्यक परवानग्या आदी बाबींची माहिती द्यावी. जेणेकरून ऐनवेळी होणारी गैरसोय टाळणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.

*** 




Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा