भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जांमधील त्रुटींची १० सप्टेंबर पर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या
अर्जांमधील त्रुटींची १० सप्टेंबर पर्यंत पूर्तता करण्याचे आवाहन
लातूर (जिमाका), दि. ०३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय २६ डिसेंबर २०२४ अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी सन २०१७ पासून राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, या सुधारित योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेअंतर्गत शासन निर्णयातील नमूद अटी व शर्तींनुसार सन २०२५-२६ या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, असे 'सेंट बॅक' झालेले अर्ज आवश्यक त्रुटीपूर्ततेसाठी विद्यार्थ्यांच्या महा-आयटी पोर्टलवरील संबंधित लॉगिनवर पाठविण्यात आले आहेत. यासंबंधी महा-आयटी प्रणालीद्वारे तसेच समाज कल्याण कार्यालयाकडून वेळोवेळी विद्यार्थ्यांना संदेश (एसएमएस) आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्रुटी पूर्तता करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आपल्या अर्जातील या त्रुटींची दुरुस्ती करून अर्ज पुनरार सादर करण्यासाठी १० सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. 'सेंट बॅक' झालेले व विद्यार्थी लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जांवर कार्यालयाकडून कोणतीही थेट कार्यवाही करता येत नसल्याने, विहित मुदतीत त्रुटीपूर्तता न झाल्यास ऑनलाइन अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांचीच राहणार आहे. तरी सन २०२५-२६ मधील 'सेंट बॅक' अर्ज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या लॉगिनवर जाऊन आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करून आपले ऑनलाईन अर्ज १० सप्टेंबर २०२६ पूर्वी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या लॉगिनवर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment