अवैध सावकारीविरोधात उदगीरमध्ये सहकारी संस्थेकडून झडती पाच ठिकाणी धाड ; कर्ज व्यवहाराची कागदपत्रे जप्त
अवैध सावकारीविरोधात उदगीरमध्ये सहकारी विभागाकडून झडती
पाच ठिकाणी धाड ; कर्ज व्यवहाराची कागदपत्रे जप्त
लातूर, दि. २ (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर व तालुक्यातील अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने आज धडक कारवाई केली. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ठिकाणी झडती घेण्यात आली. या कार्यवाहीत आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज, कागदपत्रे, रोकड, खाती, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, स्थावर मालमत्तेचे खरेदीखत व इसारचिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पुढील चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे उदगीरचे सहकारी संस्थेचे सहायक निबंधक महेश कच्छवे यांनी कळवले आहे.
जिल्ह्यातील अवैध सावकारीविरोधात नागरिकांनी संबंधित तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्या कार्यालयाकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही श्री. कच्छवे यांनी केले आहे.
उदगीर शहर व तालुक्यातील अवैध सावकारी व्यवसायाबाबत सहकार विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत २ सप्टेंबर २०२६ रोजी पाच ठिकाणी झडतीची कार्यवाही करण्यात आली आहे.
यामध्ये साधू रामचंद्र कांबळे, पप्पू ऊर्फ सतीश पांढरे व राजीव बिरादार, फिरोजखान नामुरखान पठाण, अमोल अशोक कोल्हेकर आणि विक्रम माने यांच्या ठिकाणांचा समावेश आहे. संबंधित ठिकाणे उदगीर शहर तसेच तालुक्यातील विविध भागातील आहेत.
कारवाईसाठी सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. झडती पथकांना संरक्षणासाठी उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली.
ही कार्यवाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, सहकारी संस्थेचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा निबंधक (सावकारी) व्ही.एल. पोतंगले, उदगीर तहसीलदार राम बोरगावकरयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, असेही त्यांनी कळवले आहे.
****
Comments
Post a Comment