एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसमध्ये सवलतीचे मॅन्युअल तिकीट ३० सप्टेंबरपर्यंत ग्राह्य धरणार
एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसमध्ये
सवलतीचे मॅन्युअल तिकीट ३० सप्टेंबरपर्यंत ग्राह्य धरणार
• तांत्रिक अडचणी आल्यास कार्डधारक ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मॅन्युअल तिकिटावर सवलतीचा प्रवास
लातूर, दि. ०२ : एसटी महामंडळात मे. ईबिक्स कॅश कंपनीमार्फत तिकीट व ई-तिकीट प्रणालीची कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रणालीमध्ये काही तांत्रिक त्रुटी आणि अडचणी येत असल्याने त्यात आवश्यक सुधारणा करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यानुसार, ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी कार्ड) साठी नोंदणी केली आहे, परंतु त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड प्राप्त झाले नाही, अशा लाभार्थ्यांकडे एनसीएमसी कार्ड नोंदणीची पावती असल्यास ती ग्राह्य धरली जाणार आहे. अशा पावतीच्या आधारे प्रवाशांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्याची विशेष मुभा देण्यात आली आहे.
याशिवाय, ०१ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे आणि एनसीएमसी कार्ड कार्यप्रणालीच्या सर्व्हरवर अचानक वाढलेल्या 'हिट्स'मुळे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान सवलतीचे तिकीट मिळण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर तात्काळ उपाययोजना म्हणून ज्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड उपलब्ध आहे, त्यांना देखील सर्व्हरच्या समस्येमुळे अडचण येत असल्यास १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलतीचा प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांनी दिली आहे.
****
Comments
Post a Comment