लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करण्याचे आवाहन • नवीन नाव नोंदणी, नावातील दुरुस्तीसाठी हरकती दाखल करता येणार लातूर, दि. ०१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटीस टप्पा व दावे-हरकतींचा निपटारा करण्यात येणार असून ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास नवीन नाव नोंदणी, नावातील दुरुस्ती अथवा हरकती निर्धारित मुदतीत दाखल कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रारूप मतदार यादी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांना संबंधित बीएलओ किंवा तहसील कार्यालयातही ती पाहता येणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीमध्ये आढळलेले अनमॅप्ड २३,६९८ मतदार आणि ॲनोमलीज असलेले २९,४२७ मतदार, अशा एकूण ५३,१२५ मतदारांच्या दाव्यांची व हरकतींची सुनावणी ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६ या नोटीस टप्प्याच्या कालावधीत घेतली जाणार आहे. ज्या पात्र नागरिकांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही, तसेच १ ऑक्टोबर २००६ पूर्वी जन्म झालेल्या व १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना अथवा नव्याने विवाह झालेल्या महिलांना फॉर्म-६ द्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. यासाठी रंगीत छायाचित्र, आधार कार्ड, दहावीची सनद अथवा टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र अथवा शालेय प्रवेश निर्गम उतारा, वडिलांचे किंवा आईचे निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, सन २००२ मध्ये आजी अथवा आजोबा किंवा आई अथवा वडिलांच्या नावाचा मतदार यादीतील तपशील, मतदाराचा मोबाईल क्रमांक, आवश्यकतेनुसार विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतील. नाव, पत्ता, वय किंवा छायाचित्रामध्ये दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म-८ भरावा. यासोबत आधारकार्ड किंवा पॅनकार्ड किंवा वीज बिल किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा टी.सी. किंवा शालेय प्रवेश निर्गम उतारा अथवा फोटो यासारखे अनुषंगिक पुरावे सादर करावेत. मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म-७ भरता येणार आहे. यासोबत मृत्यू प्रमाणपत्र किंवा संबंधित मतदाराच्या कुटुंबातील सदस्याची फॉर्म-७ वर स्वाक्षरी घ्यावी. सर्व फॉर्म ईसीआय नेट (ECINET) ॲपद्वारे ऑनलाईन तसेच संबंधित बीएलओकडे ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अनमॅप्ड आणि ॲनॉमलीज श्रेणीतील मतदारांची सुनावणी घेऊन आवश्यक पुराव्यांच्या आधारे अंतिम यादीत नावे निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नोटीस प्राप्त झाल्यानंतर संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत