अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी शासकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी शासकीय अधिकाऱ्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन लातूर, दि. ०४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या विषयावर अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या प्रसंगी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे, बार्टीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, तज्ज्ञ व्याख्याते ॲड. भीमराव हटकर आणि विशेष सहायक सरकारी वकील ॲड. लक्ष्मण एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त उमेश सोनवणे म्हणाले, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत नवीन दृष्टीकोन तयार होण्यास मदत होईल. या कायद्याची गरज, कायद्याच्या अंमलबजावणीतून अपेक्षित साध्य समजून घेणे गरजेचे आहे. समाजातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या प्रत्येकाने कायद्याबाबत सखोल माहिती घेऊन आपली भूमिका समजून घ्यावी. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा. या प्रसंगी मार्गदर्शन करताना बार्टीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड म्हणाले की, कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळू शकतो, त्यामुळे कायदा सविस्तर समजून घेतल्यास त्याची अंमलबजावणी करणे अधिक सोपे होईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या प्रत्येक घटकाने या कार्यशाळेच्या माध्यमातून या कायद्याचे सखोल ज्ञान आत्मसात करावे आणि समाजात जनजागृती करून सर्वांनी या कायद्याचे पालन करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले. कार्यशाळेच्या प्रास्ताविकात समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी आयोजनाचा हेतू विषद करताना सांगितले की, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या वेळी त्यांनी कायद्याच्या अनुषंगाने स्थापित जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्यांच्या कामकाजाविषयी माहिती दिली. यानंतर तज्ज्ञ व्याख्याते ॲड. भीमराव हटकर व विशेष सहायक सरकारी वकील ॲड. लक्ष्मण एन. शिंदे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम २०१६ या विषयावर उपस्थित अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत