दत्तक विधान नियमन २०२२ च्या पुनरावलोकनासाठी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
दत्तक विधान नियमन २०२२ च्या पुनरावलोकनासाठी
हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०२ : महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी' (सीएआरए - CARA) कडून दत्तक विधान प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या कायदेशीर चौकटीला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आणि त्यासंबंधी उद्भवणाऱ्या विविध कायदेशीर, प्रक्रियात्मक तसेच अंमलबजावणीविषयक मुद्द्यांचे योग्य निराकरण करण्यासाठी 'दत्तक विधान नियमन, २०२२' (Adoption Regulations, 2022) चा आढावा घेतला जात आहे.
या पार्श्वभूमीवर 'दत्तक विधान नियमन, २०२२' मधील ज्या तरतुदींमध्ये सुधारणा करणे, नवीन तरतूद समाविष्ट करणे, विद्यमान नियमांत बदल करणे किंवा एखादी तरतूद वगळणे आवश्यक वाटत असेल, त्याबाबत सकारण अभिप्राय व सूचना सर्वसामान्य जनता, संबंधित संस्था आणि भागधारकांकडून मागविण्यात येत आहेत.
सादर करावयाचे अभिप्राय हे ठराविक नमुन्यात दोन भागांत विभक्त करून द्यावयाचे असून, भाग 'अ' मध्ये अभिप्राय अथवा सूचना सादर करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा एजन्सीचा संपूर्ण तपशील जसे की नाव, पत्ता, ई-मेल व मोबाईल क्रमांकासह संपर्क माहिती नमूद करावी लागणार आहे, तर भाग 'ब' मध्ये दत्तक विधान नियमन, २०२२ मधील संबंधित नियम आणि त्याबाबतचा प्रस्तावित बदल, अभिप्राय किंवा सूचनेचे सविस्तर औचित्य स्पष्ट करावे लागणार आहे.
तरी लातूर जिल्ह्यातील दत्तक विधान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त संस्था, बाल कल्याण क्षेत्रातील व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी दत्तक नियमावलीतील आपल्या सूचना व अभिप्राय legal.policy@gov.in या ई-मेल आयडीवर पीडीएफ (PDF) स्वरूपात सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment