पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोत्यासाठी लातूर जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत एकवेळ समझोत्यासाठी लातूर जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध • ३१ मार्च २०२७ पर्यंत रक्कम भरण्याची मुदत लातूर, दि. २० : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एकवेळ समझोता योजनेसाठी पात्र ठरलेल्या १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांची यादी आज (दि. २०) आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, विशिष्ट क्रमांक, बँक कर्जखाते तपशिल, रकाना क्रमांक नऊमध्ये ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकीची रक्कम, रकाना क्रमांक दहामध्ये एकवेळ समझोत्यानुसार थकबाकीची रक्कम, रकाना क्रमांक अकरामध्ये एकवेळ समझोत्यानुसार शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि रकाना क्रमांक बारामध्ये शासनामार्फत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम नमूद करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व्ही. एल. पोतंगले यांनी दिली. या योजनेत कर्ज माफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक असून, पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी एकूण २५.८१ लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २०.७२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात एकवेळ समझोत्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांपवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ आणि बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’ मध्ये जोडण्यात आली असून, ही यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एकवेळ समझोता पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, बँकेच्या शाखा आणि विकास संस्थांच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील सर्व तपशील तपासून आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांपवरील रक्कम संबंधित बँकेत जमा करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्जखाते एकाच बँकेत आहे, त्यांनी यादीतील रकाना क्रमांक अकरामध्ये नमूद केलेली रक्कम संबंधित बँकेच्या कर्जखात्यात भरावी. ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्जखाती आहेत, त्यांना आपल्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही कर्जखात्यात भरण्याची सुविधा देण्यात आली आहे, मात्र कोणत्याही एका खात्यात यादीतील रकाना क्रमांक दहामध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा किंवा एकवेळ समझोता योजनेनुसार बँकेस देय असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम भरू नये. शेतकऱ्यांनी योग्य ती माहिती घेऊनच बँकेत रक्कम जमा करावी आणि बँक अधिकाऱ्यांनी याबाबत शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांपवरील रक्कम संबंधित बँकेत भरल्यानंतर बँकांनी त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत राहणार आहे. यादीतील शेतकऱ्यांनी भरणा केलेल्या रकमेची अद्ययावत माहिती दर शुक्रवारी बँकामार्फत पोर्टलवर अपलोड केली जाईल आणि माहिती पोर्टलवर अपलोड केल्याची बाब बँकेने शेतकऱ्यास कळवायची आहे. त्यानंतर महाआयटीमार्फत शेतकऱ्याने यादीनुसार रक्कम भरल्याची खात्री पोर्टलवर केली जाईल आणि रक्कम भरणा केल्याचे अद्ययावतीकरण झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित शेतकऱ्याला आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. योजनेच्या निकषांनुसार शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी असणे बंधनकारक असल्याने ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केली आहे, अशाच शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करून संबंधित बँकेत हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर निकषांनुसार दोन लाख रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात येईल आणि शासनाने ही रक्कम वर्ग केल्यानंतर शेतकऱ्याची कर्जमुक्ती होणार आहे. एकवेळ समझोता योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली ही केवळ एकच यादी नसून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पात्र शेतकऱ्यांच्या पुढील याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये मयत झालेले शेतकरी तसेच वयस्कर किंवा बोटांच्या ठशाची नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याच्या अनुषंगाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांना निकषांनुसार लाभाची रक्कम थेट कर्जखात्यात वितरित केली जाईल, असे आवाहन लातूरचे जिल्हा उपनिबंधक श्री. पोतंगले यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत