लातूर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने धान्य वाटप; लाभार्थ्यांना अचूक आणि दर्जेदार धान्य वितरणाचे नियोजन

*लातूर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने धान्य वाटप; लाभार्थ्यांना अचूक आणि दर्जेदार धान्य वितरणाचे नियोजन* लातूर, दि. १९: लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर असून, जिल्ह्यातील सर्वच रास्तभाव दुकानांमधून केवळ इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने धान्य वाटप केले जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. लाभार्थ्यांना अचूक आणि दर्जेदार धान्य मिळावे यासाठी सर्व स्तरांवर काटेकोर नियोजन केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लातूर जिल्ह्यासाठी येणारा तांदूळ शासकीय गुणवत्ता नियंत्रकांकडून तपासला जातो. धान्याचा दर्जा उत्तम असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहतूक प्रतिनिधींमार्फत हा तांदूळ जिल्ह्यात पाठवला जातो. प्रशासनाच्या वतीने धान्याच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. धान्य मोजमापात पारदर्शकता राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देताना इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचाच वापर करीत आहेत. धान्य मोजून दिल्यानंतर ई-पॉस मशीनद्वारे लाभार्थ्याला धान्याची पावती दिली जाते, ज्यामुळे वजनात तफावत होण्याची शक्यता राहत नाही. शासनाकडून मंजूर झालेले सर्व धान्य ई-पॉस मशीनद्वारेच वितरित करणे दुकानदारांना बंधनकारक आहे. दुकानदाराने चालू महिन्यात केलेल्या ऑनलाईन वाटपाच्या नोंदींवरूनच पुढील महिन्याचे धान्य मंजूर होते आणि प्रत्यक्ष वाटप केलेल्या धान्याच्या प्रमाणावरच त्यांना कमिशन (मार्जिन) रक्कम मिळते. या संगणकीय प्रणालीमुळे सर्व दुकानदार लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पूर्ण धान्य वाटप करतात. दरम्यान, शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अंत्योदय अन्न योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनाच साखर वाटप करण्याचे नियतन मंजूर करण्यात आले असून त्यानुसारच साखरेचे वाटप सुरू आहे. तरी, लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानातून धान्य घेताना ई-पॉस पावतीची खात्री करून ती अवश्य घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत