नशामुक्त युवा, विकसित भारत संकल्पनेवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

नशामुक्त युवा, विकसित भारत संकल्पनेवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन § लोकनृत्य, लोकगीत, पथनाट्य, चित्रकला व कविता लेखन स्पर्धा § २३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत लातूर, दि. १९ (जिमाका) : नशामुक्त युवा, विकसित भारतासाठी या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी २३ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंढे यांनी केले आहे. इच्छुक युवक-युवतींनी गुगल फॉर्म आणि MY Bharat पोर्टलवर २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. महाविद्यालये, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि युवा मंडळांनी अधिकाधिक युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी धिरज बावणे (मोबाईल क्रमांक ८००७९०७७१३) यांच्याशी संपर्क साधावा. विकसित भारत नेतृत्व संवाद (VBYLD) २०२७ अंतर्गत होणाऱ्या या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय स्तरावरील युवा महोत्सव १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे. सहभागी युवकांचे वय १७ ऑगस्ट २०२६ रोजी १५ ते २९ वर्षे असणे आवश्यक आहे. सहभागी युवक संबंधित जिल्ह्यातील रहिवासी किंवा त्या जिल्ह्यात शिक्षण घेणारा असावा. एका युवकाला केवळ एकाच स्पर्धेत सहभागी होता येईल. VBYLD-२०२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक या स्पर्धेसाठी पात्र नसतील. सर्व सहभागी युवकांनी MY Bharat पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. चित्रकला व कविता या साहित्यकृती मौलिक असाव्यात. कोणत्याही जाती-धर्माच्या भावना दुखावणारा मजकूर किंवा वेशभूषा स्पर्धेत मान्य केली जाणार नाही. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. समूह लोकनृत्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपये, समूह लोकगीत व पथनाट्य स्पर्धेसाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार ५०० रुपये, तर कविता लेखन व चित्रकला स्पर्धेसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार ५०० रुपये पारितोषिक दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत