उदगीर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०३ उमेदवारांची प्राथमिक निवड
उदगीर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात
१०३ उमेदवारांची प्राथमिक निवड
लातूर, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्यातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर मॉडेल करिअर सेंटर आणि उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात १०३ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर ६५ उमेदवारांची अंतिम निवड पूर्ण झाली.
या रोजगार मेळाव्यात हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते. त्यांनी प्रत्यक्ष मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड केली. मेळाव्याच्या प्रारंभी कौशल्य विकास सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. युवकांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. के. मस्के, प्रा. डॉ. जी. जी. जेवळीकर, प्रा. डॉ. साबदे आणि लातूर मॉडेल करिअर सेंटरचे यंग प्रोफेशनल दत्तात्रय कांबळे यांनी कौशल्याच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले.या मेळाव्यात १२ आस्थापनांनी ३३५ पदे अधिसूचित केली होती. या पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच, शासनाच्या विविध रोजगार आणि स्वयंरोजगार योजनांची माहिती उमेदवारांना देण्यात आली.
रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये १०३ उमेदवारांची मुलाखतींद्वारे प्राथमिक निवड झाली, तर ६५ उमेदवारांची अंतिम निवड पूर्ण झाली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी दिली.
*****
Comments
Post a Comment