सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

सार्वजनिक आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालकमंत्र्यांनी केले लातूर जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन • दोन वर्षांत १९ आरोग्य संस्थांना मिळाले राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन • राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालयाला एनक्यूएएस मानांकन लातूर, दि. १७ : लातूर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांनी गेल्या दोन वर्षांत कायाकल्प पुरस्कार आणि राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) प्राप्त करून आपले नाव उज्ज्वल केले आहे. विशेषतः राज्यात प्रथमच ग्रामीण रुग्णालय श्रेणीत मुरुड ग्रामीण रुग्णालयाने एनक्यूएएस मानांकन मिळवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाबद्दल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह जिल्हा आरोग्य विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. सन २०२४ मध्ये जिल्ह्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ८ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना राष्ट्रीय पातळीवरील आणि शासनाच्या आरोग्य विभागात सर्वोच्च समजले जाणारे राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (एनक्यूएएस) मिळाले आहे. सन २०२५ मध्ये ८ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना हे मानांकन प्राप्त प्राप्त झाले आहे. याशिवाय, ३० आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांची राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी निवड झाली आहे. या मानांकनासाठी निवड करताना आरोग्य केंद्रातील सेवा, रुग्णांचे हक्क, वैद्यकीय काळजी, संसर्ग नियंत्रण, गुणवत्ता व्यवस्थापन आणि परिणाम आदींच्या सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेची पडताळणी केली जाते. सन २०२४-२५ या वर्षात कायाकल्प पुरस्कारामध्येही लातूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भातांगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २ लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पुरस्कार आणि तीन आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना १.८५ लाख रुपयांचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. याशिवाय, १४७ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकनामध्ये ग्रामीण रुग्णालय श्रेणीत राज्यात प्रथमच मुरुड ग्रामीण रुग्णालयाची निवड झाली आहे. तसेच, जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर लातूर स्त्री रुग्णालय, उदगीर सामान्य रुग्णालय, निलंगा उपजिल्हा रुग्णालय, मुरुड ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय आणि रेणापूर ग्रामीण रुग्णालय यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे कायाकल्प प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाले आहेत. या यशामुळे लातूर जिल्ह्याची आरोग्य क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. याबद्दल पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्यासह सर्व आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील सेवांच्या सुधारणांमध्ये लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनीही योगदान देत अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. लातूर जिल्ह्यातील या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही आरोग्य यंत्रणेला सर्वतोपरी सहाय्य पुरवले जाईल, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन