अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी
ठिबक व तुषार सिंचन संचासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत
लातूर, दि. ११ (जिमाका) : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजना सन २०२५-२६ मध्ये राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक (२ हेक्टरपर्यंत क्षेत्र) तसेच बहुभूधारक (२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र) असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक अनुदान २५ टक्के आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती स्वावलंबन योजना अथवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पूरक अनुदान १० टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळेल.
बहुभूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून पूरक अनुदान ३० टक्के आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती स्वावलंबन योजना अथवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पूरक अनुदान १५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/agriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत.ठिबक आणि तुषार सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होते, तसेच आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होते. याशिवाय, पाण्याचा काटेकोर वापर होऊन तणांची वाढ रोखण्यासही मदत होते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment