लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर
लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर
लातूर, दि. २५ (जिमाका): जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळून आला असून आतापर्यंत चार तालुक्यातील १२ गावांमध्ये एकूण ४७ बाधित गोवर्गीय जनावरांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने तातडीने सज्जता दाखवत शीघ्र कृती दल स्थापन केले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व १३२ पशु चिकित्सालये व तीन फिरते पशु चिकित्सालय आदी पशुवैद्यकीय संस्थांना शासनाच्या मानक कार्यपद्धतीनुसार विलगीकरण, औषधोपचार, बाह्यपरोपजीवी नियंत्रण आणि डिसइन्फेक्शनबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
बाधित गावे आणि बाधित जनावरांची स्थिती
अहमदपूर तालुका: वरवंटी, धसवाडी, कोंडगाव, ब्रम्हपुरी, शिंदगी – या ५ गावांत प्रादुर्भाव.
२६ जनावरांपैकी ५ बरे, १९ वर उपचार सुरू, २ मृत्यू.
लातूर तालुका: बोरवटी,खुलगापूर, सलगरा ही तीन गावे ३ रुग्णांपैकी २ बरे, १ वर उपचार सुरू.
उदगीर तालुका: हेर, डोंगरशेळकी, देवर्जन – या ३ गावांत प्रादुर्भाव.
७ बाधित जनावरांपैकी ३ बरे, ४ वर उपचार सुरू.
देवणी तालुका: अंबानगर गोशाळा – येथे ११ बाधित जनावरे, उपचार सुरू असून काही बरे झाले आहेत.
एकूण : चार तालुक्यातील १२ गावांतील ४७ बाधित बाधित जनावरांपैकी १० जनावरे पूर्ण बरी झाली असून २ जनावरांचा मृत्यू, उर्वरितांवर उपचार सुरू आहेत.
लसीकरण आणि प्रशासनाची तयारी
लसींचा पुरेसा साठा:
जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनासाठी १,७६,५०० लसी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १,५९,५०० लसीकरणासाठी वापर करण्यात आल्या आहेत. सध्या १७,००० लसी शिल्लक असून त्या तातडीने पशुपालकांच्या जनावरांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष:
जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन आजाराची माहिती गोळा केली जात आहे.
गोचीड व माश्यांचे नियंत्रण:
बाधित व शेजारील गावांत गोचीड, माश्या आणि इतर बाह्य परोपजीवींचे नियंत्रण करण्यासाठी औषधांची फवारणी व विशेष उपाययोजना केली जात आहे.
शीघ्र कृती दल:
प्रत्येक बाधित गावात तात्काळ पोहोचून तपासणी, उपचार, नमुने गोळा करणे व विलगीकरणाच्या सूचना देण्यासाठी शीघ्र कृती दल सज्ज ठेवण्यात आले आहे.
पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना
सर्व संस्था प्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील लसीकरण मोहिमा, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर भर द्यावा. बाधित रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार उपचार करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिल्या आहेत.
पशुपालकांनी सतर्क राहून आपला गोठा स्वच्छ ठेवावा. बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी. जर पशुरुग्ण आढळून आला तर तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.
पशुपालकांना आवाहन
🔹 आपल्या गोवर्गीय पशुधनाला लंपी रोगप्रतिबंधक लस तात्काळ द्यावी.
🔹 आजाराची लक्षणे (त्वचेवर गाठी, ताप, भूक मंदावणे) आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.
🔹 गोठ्यांमध्ये स्वच्छता ठेवून गोचीड व माश्यांचे नियंत्रण करावे.
🔹 नियंत्रण कक्ष व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून दैनंदिन आजाराची माहिती द्यावी.
*****
Comments
Post a Comment