लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल विभागाचे आणखी एक पाऊल ! महसूल सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान लातूर जिल्ह्यात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन लातूर, दि. ३१ (जिमाका): महसूल दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह साजरा केला जाणार आहे. महसूल व वन विभागाच्या २९ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, या सप्ताहात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. या माध्यमातून महसूल विभागाच्या योजना आणि कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांचे जीवन सुखकर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा ते सात महिन्यांत महसूल विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये नवीन वाळू धोरण २०२५ लागू करून स्थानिक गृहनिर्माण लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ ब्रास वाळू मोफत उपलब्ध करणे, महाखनिज पोर्टलद्वारे पारदर्शक वाहतूक परवाने, तसेच पर्यावरणपूरक एम- सँड उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे. तसेच, जिवंत सातबारा मोहिमेला गती देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून प्रलंबित फेरफार नोंदी पूर्ण करणे, सातबारा वाटप आणि ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी करून फार्मर आयडी वाटप करण्यात आले. सलोखा योजने अंतर्गत कौटुंबिक मालमत्तेच्या वाटपासाठी दस्तनोंदणीवरील मुद्रांक शुल्क माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे कौटुंबिक वादांचे निराकरण सुलभ झाले. याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक वर्षी सर्व महसूल मंडळांमध्ये चार वेळा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूलविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंडळ स्तरावर समाधान शिबिरे आयोजित केली जातात. महसूल विभागाच्या योजनांचा लाभ आणि माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदा १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान महसूल सप्ताह राबविला जाणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावर १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:११ वाजता महसूल दिन साजरा करून या सप्ताहाचा शुभारंभ होईल. यावेळी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण आणि लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप होईल. २ ऑगस्ट रोजी सन २०११ पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याची कार्यवाही होईल. ३ ऑगस्ट रोजी पाणंद आणि शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जाईल. ४ ऑगस्ट रोजी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक मंडळानिहाय राबवले जाईल. ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजने अंतर्गत डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान वाटप केले जाईल. ६ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत नियमानुसार निर्णय घेतले जातील. ७ ऑगस्ट रोजी M-Sand धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) चा पूर्वाभ्यास घेतला जाईल, तसेच महसूल सप्ताहाचा समारोप होईल. नागरिकांनी या उपक्रमांत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन