पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
• लातूर जिल्ह्यात पाणी आणि चारा टंचाईचा आढावा
• रात्रीच्या गस्तीसह अवैध पाणी उपशावर कारवाईच्या सूचना
लातूर, दि. ०८ (जिमाका) : जिल्ह्यातील पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्याव्यात. तसेच मांजरा धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनवरून होणारी पाणीचोरी, जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाई करून सिंचन प्रकल्पांवर रात्रीची गस्त वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या. पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने बुधवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहूल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, संदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, मंजुषा लटपटे, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, शरद झाडके, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गावनिहाय नियोजन
नगरपालिका व नगरपंचायतींनी त्यांच्या मालकीच्या सर्व विंधन विहिरी तसेच पाणी पुरवठा योजनांच्या विहिरींची दुरुस्ती करून घ्यावी. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःच्या मालकीच्या विंधन विहिरींतून पाणी उपसा कमी करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना मानवी वापरासोबतच पशुधनासाठी लागणाऱ्या पाण्याचाही आवश्यकतेनुसार समावेश करावा.
तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी सद्यस्थितीत उपलब्ध असलेले जलसाठे आणि पर्यायी जलस्त्रोत यांचा विचार करून पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने गावनिहाय आराखडा तयार करावा. तसेच ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून प्रत्येक गावातील पाणी पुरवठ्याचा सविस्तर आढावा घ्यावा. उपलब्ध जलस्रोत किती दिवस पुरतील आणि त्यानंतर कोणते पर्यायी जलस्रोत वापरता येतील, याची अचूक माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
चारा उपलब्धता आणि टंचाई काळातील नियोजन
पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील पशुधनाची गावनिहाय संख्या संबंधित तहसीलदारांकडे तातडीने उपलब्ध करून द्यावी. पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून पर्यायी चाऱ्याची माहिती गोळा करावी. ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेतून चारा लागवडीचे नियोजन करण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना एक ते दीड महिन्यात तयार होणाऱ्या चाऱ्याची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. पशुसंवर्धन विभागाने त्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी नमूद केले.
‘व्हीबी-जी राम जी’मध्ये जलसंधारणाच्या कामांना मंजुरी
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होण्यासाठी व्हीबी-जी राम जी योजनेअंतर्गत कामांचे योग्य नियोजन करावे. यामध्ये जलसंधारण, तलावांतील गाळ उपसा आणि चारा लागवडीची कामे मंजूर करून सेल्फवर ठेवावीत. परिस्थितीनुसार ही कामे तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता आधीच करून ठेवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.
****


Comments
Post a Comment