नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे, विहीर-कूपनलिका पुनर्भरणाच्या कामांना विशेष प्रोत्साहन
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेततळे,
विहीर-कूपनलिका पुनर्भरणाच्या कामांना विशेष प्रोत्साहन
लातूर, दि. ०९ (जिमाका): नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा २ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता वाढविणे, भूजल पातळीत सुधारणा करणे तसेच शेतीची उत्पादकता व शाश्वतता वाढविणे या उद्देशाने विविध जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत शेततळे निर्मितीसह उपलब्ध विहिरी व कूपनलिकांचे पुनर्भरण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून, पावसाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी शेतातच अडवून त्याचा साठा करणे आणि भूजल पुनर्भरणास गती देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
शेततळ्याच्या माध्यमातून पावसाचे पाणी शेतात साठवून त्याचा उपयोग ऐन गरजेच्या वेळी संरक्षित सिंचनासाठी करता येत असल्याने पिकांची पाण्याची गरज सुलभतेने भागवता येते, तसेच पाण्याचा शाश्वत पुरवठा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य पीक नियोजन करून पीक पद्धतीमध्ये आवश्यक सकारात्मक बदल करणे शक्य होते. यासोबतच विहीर व कूपनलिका पुनर्भरणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी थेट भूगर्भात मुरण्यास मदत होऊन परिसरातील भूजल पातळी उंचावते आणि सिंचनासाठी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण होतात.
याच पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून ‘पाणी अडवा – पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्षात आणून जलसंधारण व भूजल पुनर्भरणाद्वारे शाश्वत शेतीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या योजनांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. या घटकांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक अथवा कृषीताई यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment