लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अतिजोखमीच्या गरोदर मातांना विशेष प्रसूतीपूर्व आरोग्य सेवांचा लाभ
लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत अतिजोखमीच्या
गरोदर मातांना विशेष प्रसूतीपूर्व आरोग्य सेवांचा लाभ
लातूर, दि. ०९ (जिमाका) : जिल्ह्यात १७ सप्टेंबर, २०२६ ते १७ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून जिल्ह्यातील अतिजोखमीच्या गरोदर मातांसाठी विशेष प्रसूतीपूर्व तपासणी (एएनसी) व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून अतिजोखमीच्या गरोदर मातांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्या नियमित व विशेष प्रसूतीपूर्व तपासण्या करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, हिमोग्लोबीन, रक्तशर्करा यांसारख्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या, मोफत औषधोपचार आणि पोषणविषयक सखोल समुपदेशन केले जात आहे. तसेच, गर्भाच्या वाढीचे नियमित निरीक्षण करणे, प्रसूतीची अपेक्षित तारीख लक्षात घेऊन प्रसूतीचे योग्य ठिकाण निश्चित करणे आणि सुरक्षित संस्थात्मक प्रसूतीबाबत गरोदर माता व त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन केले जात आहे. वैद्यकीय गरजेनुसार अतिजोखमीच्या गरोदर मातांना पुढील तातडीच्या व उच्चस्तरीय उपचारासाठी विशेष आरोग्य संस्थांमध्ये संदर्भीत (रेफर) करण्याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
अभियानातील आरोग्य सेवांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी मंगळवारी निलंगा तालुक्यातील मदनसुरी, रामलिंग (मु), कासार बालकुंदा, हलगरा व अंबुलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला तसेच तिसऱ्या पल्ल्यातील भेटी, आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधांच्या कामकाजाची पाहणी केली. यासोबतच आरोग्य केंद्रांचे फायर ऑडिट, अग्निशमन यंत्रणेची सज्जता आणि बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनांतर्गत आवश्यक असलेले एमपीसीबी प्रमाणपत्र आदी बाबींचीही तपासणी केली. डॉ. शिंदे यांनी अतिजोखमीच्या गरोदर मातांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पडताळणी केली आणि त्यांच्याशी आहार, पोषण व आरोग्याविषयी चर्चा करून मोलाचे समुपदेशन केले.
सेवा संकल्प अभियानाच्या उर्वरित कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरोदर मातांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. तसेच गरोदरपणात अचानक रक्तस्त्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे अथवा हात-पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे यासारखी कोणतीही धोक्याची लक्षणे दिसून आल्यास अजिबात दुर्लक्ष न करता आशा सेविका व आरोग्य सेविकांच्या सल्ल्याने तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
***

Comments
Post a Comment