उदगीरमध्ये कथित अवैध सावकारी प्रकरणी सहकार आणि पोलीस पथकाकडून छापा
उदगीरमध्ये कथित अवैध सावकारी प्रकरणी सहकार आणि पोलीस पथकाकडून छापा
लातूर, दि. ०९ (जिमाका): सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये ही धडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बिदर गेट, साई नगर, उदगीर येथील रहिवासी संभाजी नागप्पा खिंडीवाले यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. प्राप्त तक्रारीवरून सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी झडती व तपासणी सत्र राबवले.
या झडतीदरम्यान पुढील चौकशीसाठी आवश्यक असलेले व कथित अवैध सावकारी व्यवहाराबाबत संशय निर्माण करणारे व्याज उल्लेखाच्या हिशोब वह्या, विविध दस्तऐवज आणि त्यांच्या प्रती सहकार विभागाच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे आता सावकारी कायद्यांतर्गत पुढील सखोल चौकशी करण्यात येणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तसेच विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या संपूर्ण तपासणी प्रक्रियेसाठी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर आणि उदगीर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी प्रशासकीय मदत पुरवली.
कारवाईच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत सहकार अधिकारी श्रेणी-२ चे पथक प्रमुख व्ही. एन. विभुते यांच्यासह कनिष्ठ लिपीक एम. बी. सुवर्णकार आणि कनिष्ठ लिपीक श्रीमती डी. ए. गायकवाड यांनी भूमिका बजावली. या मोहिमेदरम्यान पोलीस विभागाने आवश्यक सुरक्षा पुरवली, तर शासकीय दूध योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले.
उदगीर तालुक्यात अवैध सावकारी करणाऱ्यांवर नियंत्रण व कठोर कारवाई करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार दाखल करावी. माहिती देणाऱ्या तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन उदगीर येथील सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी केले आहे.
***
Comments
Post a Comment