चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा विशेष उपक्रम ! रब्बी हंगामात १०० टक्के अनुदानावर होणार ज्वारीचे चारा बियाणे वाटप • १ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा विशेष उपक्रम !
रब्बी हंगामात १०० टक्के अनुदानावर होणार ज्वारीचे चारा बियाणे वाटप
• १ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. ०९ (जिमाका): जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या गंभीर चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने विशेष पाऊल उचलले आहे. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वैरण विकास योजना - चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या रब्बी महिन्यांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, अशा पात्र पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर ज्वारीच्या चारा बियाण्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
भविष्यातील संभाव्य चारा टंचाई टाळणे, दुष्काळ परिस्थितीत पशुधनासाठी पौष्टिक हिरवा चारा उपलब्ध करून देणे, पशुपालकांचे आर्थिक नुकसान कमी करणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात पशुधनाचे संरक्षण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेद्वारे वैयक्तिक शेतकरी आणि नोंदणीकृत शेतकरी समूह गटांना १०० टक्के अनुदानावर बियाणे पुरवून हिरव्या चारा उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच उत्पादित झालेला चारा भविष्यातील टंचाईसाठी सायलेज (मुरघास) किंवा इतर साठवण पद्धतींद्वारे जतन करून ठेवण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन व सिंचन सुविधा असणे, किमान ३ ते ४ पशुधन असणे आणि १ हेक्टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे. तर नोंदणीकृत शेतकरी समूह गटांसाठी ५ हेक्टर क्षेत्राची मर्यादा लागू करण्यात आली आहे. अर्जासोबत ७/१२ उतारा, लागू असल्यास वनहक्क प्रमाणपत्र किंवा समूह गट नोंदणी प्रमाणपत्र आणि पशुधनाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक पशुपालकांसाठी अर्जाची गुगल फॉर्म लिंक लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उत्पादित केलेला चारा दुष्काळ व टंचाईच्या काळात पशुधनासाठी जीवनदायी ठरणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या संधीचा लाभ घेऊन तात्काळ अर्ज करावेत, असे आवाहन लातूरचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. आर. डी. पडीले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका पशुसंवर्धन कार्यालय, स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय लातूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
***
Comments
Post a Comment