पाणीटंचाई उपाययोजनांसाठी लातूर जिल्हा प्रशासन 'ऑन फिल्ड' रेणा प्रकल्पातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी
पाणीटंचाई उपाययोजनांसाठी लातूर जिल्हा प्रशासन 'ऑन फिल्ड'
रेणा प्रकल्पातील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी,
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडून पाहणी
• अवैध पाणी उपसा तातडीने रोखण्याचे निर्देश
• पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याच्या उपलब्धतेचाही घेतला आढावा
लातूर, दि. ०९ : अपुऱ्या पावसामुळे लातूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट पसरले असताना, प्रशासकीय यंत्रणा केवळ कागदावर काम न करता प्रत्यक्ष 'ऑन फिल्ड' उतरली आहे. गुरुवारी कडक उन्हाची तमा न बाळगता जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी रेणा मध्यम प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेतला.
या वेळी केवळ पाहणी करून न थांबता, त्यांनी बर्दापूर हद्दीत पसरलेल्या रेणा प्रकल्पाच्या क्षेत्रात पायी फिरून पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली व अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढवा घेतला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना यांनी रात्रीच्या वेळी भंडारवाडी येथील प्रकल्प क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली होती.
'एल निनो'च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील हे लक्षात येताच प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांतील पाणी तातडीने पिण्यासाठी आरक्षित केले आहे. तसेच अवैध उपसा रोखण्यासाठी संयुक्त पथके गठीत करण्यात आली आहेत. केवळ आदेश काढून न थांबता जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड हे स्वतः विविध सिंचन प्रकल्पांना भेटी देऊन उपलब्ध पाणीसाठा आणि अवैध उपसा रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. यापूर्वी त्यांनी मांजरा आणि निम्न तेरणा प्रकल्पांसह जिल्ह्यातील इतर लघु प्रकल्पांनाही भेटी देऊन पाहणी केली आहे.
सद्यस्थितीत रेणा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा पाणीसाठा पूर्णपणे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असल्यामुळे प्रकल्पातून होणारा अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी महावितरणला तात्काळ आदेश देऊन अवैध पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपांची वीजजोडणी खंडित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, जलसंपदा विभागाच्या विशेष पथकाने प्रकल्प परिसरात गस्त वाढवून अवैध उपशाला पूर्णपणे आळा घालावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच ग्रामीण भागातील पशुधनाच्या चाऱ्याच्या उपलब्धतेबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प परिसरातील पिकांची माहिती घेतली आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणी दौऱ्यात औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात, अपर तहसीलदार संदीप पाटील, अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, रेणापूरचे गट विकास अधिकारी सुमित जाधव यांच्यासह महसूल, जलसंपदा आणि महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
**
Comments
Post a Comment