हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा धार्मिक सहिष्णुता, मानवतेचा संदेश पोहोचतोय घरातघरात
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०
व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग आणि
राज्यस्तरीय समागम समितीमार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने लातूर जिल्ह्यात विशेष
जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, ज्याचा मुख्य उद्देश गुरु तेग बहादूर
साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास, त्यांचा धार्मिक सहिष्णुता व मानवतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा
आहे.
शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना
'हिंद-दी-चादर' अर्थात भारताची
ढाल म्हणून ओळखले जाते. त्यांनी मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी
आपले प्राण पणाला लावले. त्यांच्या बलिदानामुळे धार्मिक सहिष्णुता आणि
मानवाधिकारांचे एक अनोखे उदाहरण जगासमोर आले. या बलिदानाला
३५० वर्षे पूर्ण झाली झाली,
त्यानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य शहीदी समागम
कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता
आहे, यासाठी सज्जता सुरु आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंद-दी-चादर श्री गुरु तेग
बहादूर साहिबजी यांचा इतिहास घराघरात पोहचावा, यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम
हाती घेतली आहे. राज्य समन्वयक समितीच्या शिफारशीप्रमाणे गुरु तेग बहादूर
साहिबजींच्या जीवनावरील विशेष गीत जिल्ह्यातील २ हजार ६६६ शाळा आणि
महाविद्यालयांमध्ये दररोजच्या परिपाठात गाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार
कार्यवाही सुरु झाली असून हे गीत विद्यार्थ्यांना आणि समाजातील नागरिकांना हिंद-दी-चादर
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देण्यासाठी उपयुक्त
ठरत आहे. हे गीत त्यांच्या त्याग, साहस आणि धार्मिक
सहिष्णुतेचे संदेश देत आहे. यासोबतच शाळांमधून
काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत. या
माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा मानवता आणि धार्मिक
स्वातंत्र्याच्या संदेश नागरिकांपर्यंत पोहचविला जात आहे.

Comments
Post a Comment