जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी
आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा
- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर, दि. २१ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.
निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी असलम तडवी, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत उपस्थित होते. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे, निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणे यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यासह मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरातील सुरक्षा नियोजनाला प्राधान्य द्यावे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असल्यास, अशा ठिकाणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घ्यावा. याठिकाणी मतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. तसेच आदर्श आचारसंहिता भंगाची बाब निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार : पोलीस अधीक्षक अमोल तांबे
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक पूर्वतयारी केली आहे. प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून मतदान व मतमोजणी या दोन दिवसांचा सुरक्षा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात बाहेरून पोलीस अधिकारी व कर्मचारी येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त तैनात केला जाईल. प्रत्येक तालुकास्तरीय पोलीस नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून बंदोबस्ताचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिल्या.
पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके व उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली.
****
Comments
Post a Comment