लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे · अपघाती मृत्यू टाळण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेण्याची गरज · अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी संवेदनशीलता दाखवा लातूर दि. ०१ : प्रत्येक व्यक्तीचा जीव मौल्यवान असतो, मात्र वाहतूक नियमांचे पालन न केल्याने आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकतो. देशात जवळपास एक ते दीड लाख व्यक्तींचा दरवर्षी अपघातात मृत्यू होतो, यामध्ये सुमारे दहा ते अकरा टक्के मृत्यू आपल्या राज्यात होतात. हे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. विशेषतः युवा वर्गाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा, युवक-युवतींनी वाहतूक नियमांचे पालन करून इतरांनाही त्याबाबत जागरूक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. लातूर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्ते सुरक्षा विषयक माहितीपुस्तिका, भिंतीपत्रिका, जनजागृती फलकाचे प्रकाशन करण्यात आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून राज्य रस्ता सुरक्षा अभियान सुरू होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने नववर्षानिमित्त वाहतूक नियमांच्या पालनाचा संकल्प करावा. आपला जीव हा सर्वात मौल्यवान आहे, वेगात वाहन चालवून आपला जीव धोक्यात घालू नका. केवळ दंड वाचविण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचविण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहने सावकाश चालवा. रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्याची संवेदनशीलता आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. रस्ता सुरक्षा का आवश्यक आहे, याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. अपघातामध्ये मृत्यू होणे दुर्दैवी बाब असून, मृत्यूमुळे होणारी हानी भरून न निघणारी आहे. अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे. दुचाकी चालवताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. अपघातात होणारे बहुतांशी मृत्यू हे हेल्मेट, सीट बेल्ट न वापरल्यामुळे होतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले. रस्ता सुरक्षा अभियान हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, रस्ते अपघातातील मृत्युदर हा एखाद्या महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी केले. तसेच पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देवू नयेत. त्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालकांवर येते, असे ते म्हणाले. प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत रेळे यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी अपघातग्रस्तांना मदत करणारे दयाराम जगन्नाथ सुडे, गणेश गिराम, आबासाहेब शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर आता ‘रडार’ची नजर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागामार्फत केली जात होती. मात्र, आता परिवहन विभागाच्या ताफ्यात आता २ नवीन ‘रडार’ वाहने दाखल झाली आहेत. यामुळे महामार्गांवर, रहदारीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कॅमेरा, सेन्सरद्वारे लक्ष ठेवता येणार आहे. तत्याने अपघात होत असलेल्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात हे वाहन तैनात केले जाणार आहे. तसेच वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणी ही वाहने तैनात केली जातील. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनावर ई-चलनद्वारे दंड आकारण्याची कार्यवाही या वाहनाद्वारे केली जाणार आहे. या वाहनांना आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. *****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित