लातूर तहसील कार्यालयात उमेदवारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

 


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६

लातूर, दि. १९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नामनिर्देशन पत्र स्वीकारणी, माघार, आचारसंहिता अंमलबजावणी, पथके स्थापना आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर तालुक्यातील सर्व उमेदवारांनी वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करावे व आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी केले.

बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, नायब तहसीलदार गणेश सरोदे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख तसेच तहसील कार्यालय व निवडणूक नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया २१ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी ११ ते ३ या कालावधीत चालणार आहे. नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा कालावधी २३ ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत असून, वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ राहील. मात्र, २५ व २६ जानेवारी रोजी सुट्ट्या असल्याने त्या दिवशी माघार प्रक्रिया होणार नाही.

१९ जानेवारी २०२६ पर्यंत १३२ व्यक्तींनी १८३ फॉर्म खरेदी केले  आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक असून नामनिर्देशन पत्रांच्या प्राथमिक तपासणीसाठी तहसील कार्यालयात १० पथके स्थापन करण्यात आली असून, उमेदवारांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी मदत कक्ष देखील उभारण्यात आला आहे. उमेदवारांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना फॉर्म भरण्यात मदत मिळेल.

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध पथके कार्यरत आहेत. यामध्ये स्थिर पथके पेठ, ममदापूर, मुरुड व महापूर या ठिकाणी कार्यान्वित राहतील. तसेच भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांचे प्रमुख म्हणून गट विकास अधिकारी श्याम गोडभरले काम पाहतील. लातूर तालुक्यातील उमेदवारांना विविध परवाने देण्यासाठी लातूर पंचायत समिती कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला असून, उमेदवारांना आवश्यक परवाने (वाहन, बॅनर इत्यादी) येथून उपलब्ध करून दिले जातील. या कक्षाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड राहतील. निवडणूक कामांसाठी मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, खर्च पथक, मतदान जनजागृती कक्ष इत्यादी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित