आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध प्रतिबंधात्मक आदेश लागू
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६
लातूर, दि. १९ (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याच दिवशीपासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये विविध आदेश निर्गमित केले आहेत.
होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावताना स्थानिक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक
निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच त्या
निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या ग्रामीण क्षेत्रामध्ये निवडणूक कालावधीत
होर्डींग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, जाहिरात
लावताना स्थानिक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक राहणार आहे. तसेच परवानगी
संपल्यानंतर इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे. तसेच या क्षेत्रात शासकीय,
निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष
किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
शासकीय
कार्यालये, विश्रामगृहे परिसरात मिरवणुका, घोषणा, उपोषण, सभा घेण्यावर निर्बंध
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १० पंचायत समित्यांची
निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय
व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये निर्गमित केलेल्या
आदेशानुसार स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रात निवडणूक कालावधीत शासकीय, निमशासकीय, स्थानिक
स्वराज्य संस्था कार्यालये, विश्रामगृहे
इत्यादी परिसरात मिरवणुका, घोषणा देणे, सभा
घेणे, आवाराचा राजकीय कामासाठी वापर करणे, रॅली काढणे, निवडणूक संबंधाने पोस्टर,
बॅनर्स, पाम्प्लेटस, कटआऊट, पेंटींग्ज, होर्डींग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य
लिहिणे किंवा घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूक कामात बाधा
निर्माण होईल, अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.
स्थानिक
स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीत नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या
प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व
माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना
इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित
केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना
मतपत्रिका छापणे या बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतीय नागरीक सुरक्षा
संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी यांनी नमुना मतपत्रिका छपाईस
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित
केले आहेत.
शासकीय
कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चा, निदर्शने, घेराव करण्यास मनाई
जिल्ह्यातील निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,
तसेच निवडणुकीवर प्रभार पडणारे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय
कार्यालये, तालुका दंडाधिकारी, सर्व शासकीय व सर्व
निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय
विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या
ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण, आत्मदहन
इत्यादी विविध प्रकारची आंदोलने
करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बध घालण्यात आले आहेत.
धार्मिक
स्थळे, रुग्णालये
किंवा शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणांच्याजवळ
तात्पुरती
पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध
जिल्हा परिषद, पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात
जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था,
तसेच या निवडणुकीवर प्रभाव पडणारे लगतचे क्षेत्रातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या
जवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे
आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.
प्रचार
फेरीमध्ये जास्तीत जास्त १० वाहने वापरण्यास मुभा
जिल्हा परिषद, पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणूक प्रचार फेरी, मिरवणुकीत जास्तीत
जास्त १० वाहने वापरता येतील. त्यापेक्षा जास्त वाहने वापरण्यास जिल्ह्यातील
निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच या निवडणुकीवर प्रभाव पडणारे लगतचे
क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
निवडणूक
निणर्य अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
लातूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीत्यांची
निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात
पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी उमेदवारांना वाहनांच्या ताफ्यामध्ये
तीनपेक्षा जास्त मोटार गाड्या, वाहनांचा समावेश करण्यास मनाई राहील. तसेच
उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या
कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे
अवारात फक्त उमेदवार, सूचक तथा अनुमोदक अथवा दोन व्यक्ती
यांना परवानगी दिली जाईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात
नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि
कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणेस प्रतिबंध करण्यात आला आहे.
प्रचार
वाहनांवर कापडी फलके, झेंडे
लावण्याबाबत आदेश
स्थानिक स्वराज्य मतदारसंघ कार्यक्षेत्रासह या निवडणुकीवर
प्रभाव पडणाऱ्या लगतच्या क्षेत्रात वाहनांवर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार
फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन
ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून २ फुट उंची पेक्षा
जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या
आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुनेच लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजूस
तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा
कापडी फलक संबंधीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार
व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी
यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर
लावता येणार नाही.
स्थानिक
स्वराज्य संस्था निवडणुकीत ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध
जिल्हा परिषद, पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणूक काळात वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून त्याचा वापर
फक्त सकाळी ६ वाजलेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी यांची
रीतसर परवानगी घेवूनच करता येईल. फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार
नाही, विशिष्ट ठिकाणी थांबूनच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा. सर्व
राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार किंवा इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत
घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित
निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
खाजगी
व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक
जागेवर झेंडे, भितीपत्रके
लावण्यास निर्बंध
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
क्षेत्रात व निवडणुकीवर प्रभाव पडणाऱ्या लगतच्या क्षेत्रात निवडणूकीच्या
प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत
आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या
प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण
होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
सार्वजनिक
रस्त्यावर, रहदारीस
अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध
लातूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत १० पंचायत समित्यांच्या
सार्वत्रिक निवडणूक काळात राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या
प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू
शकतो. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध
घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१
चे कलम ३३ अन्वये निवडणुकीचे सर्व साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निर्बंध
घालण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
मतदान व मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक
निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान व ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार
आहे. मतदान व मतमोजणी काळात शांतता, निर्भयता आणि
कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक
आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सर्व मतदान व मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर
परिसरात मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत. मतदान केंद्रापासून २०० मीटर
परिसरात मंडपे, दुकाने किंवा तात्पुरत्या रचनांचे उभारणे
पूर्णपणे प्रतिबंधित राहील. मोबाईल फोन, स्मार्ट फोन,
कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस
सेट, ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक
उपकरणे बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी राहील. निवडणूक कामाशी संबंधित नसलेली खाजगी
वाहने आणणे, संबंधित पक्षाचे चिन्हे प्रदर्शित करणे, निवडणूक कामाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश
करण्यास मनाई राहील.
*****
Comments
Post a Comment