‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम
लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास
लातूर, दि. २० : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही जिल्हास्तरीय स्पर्धा आज लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास जागविला. तसेच त्यांच्या मानवतावादी कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सौताडेकर, परीक्षक डॉ. मकरंद गिरी, दत्ता ओव्हाळ आणि डॉ. उमाकांत चलवदे उपस्थित होते.
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत सर्व तालुक्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या इतिहासावर आधारित वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक तालुकास्तरीय स्पर्धांमधून पहिल्या तीन क्रमांकांच्या स्पर्धकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली होती. उपस्थित स्पर्धकांनी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची जीवनगाथा प्रभावीपणे मांडली. या विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त स्तरावर पाठविण्यात आली आहेत.
***
Comments
Post a Comment