लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द
लातूर, दि. २९ : रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खत आणि कीटकनाशकांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. पुणे येथील संचालक (नियंत्रण व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात भरारी पथक आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान काही केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एकूण १७ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या
मध्ये बियाणे विक्रीचे १३, खत विक्रीचे २ आणि कीटकनाशक विक्रीचे २ परवाने रद्द झाले आहेत.तसेच ८ कृषी निविष्ठा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, भावफलक, साठा नोंद अद्ययावत न ठेवणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची सही/अंगठा न घेणे, बियाण्यांचा संपूर्ण तपशील बिलात न लिहिणे, उत्पादकाचा स्त्रोत न दर्शविणे, ई-पॉस वरील खत साठा आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, खतासोबत इतर निविष्ठांची लिंकिंग करणे, परवाना असूनही दुकान बंद ठेवल्यास बियाणे अधिनियम १९६६, नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशक नियम १९७१ नुसार कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी स्पष्ट केले.
*****
Comments
Post a Comment