लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

लातूर जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू लातूर, १५ (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि जळकोट तालुक्यांमध्ये प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक अशी एकूण चार शासकीय वसतिगृहे कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवर्गनिहाय अर्ज करावे लागणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी ९० टक्के, ऊसतोड कामगारांचे पाल्य असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के, ऊसतोड कामगार असलेल्या विधवा, परित्यक्ता व एकल पालक यांच्या पाल्यांकरिता ३ टक्के, तर ज्यांचे मृत्यू झालेले पालक ऊसतोड कामगार होते अशा अनाथ पाल्यांसाठी २ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ७ जुलै २०२६ रोजी अंतिम केली जाईल, तर इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करावयाचे असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ३१ जुलै २०२६ रोजी अंतिम करण्यात येणार आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, एका वेळेचा सकस नाश्ता आणि दोन वेळचे चविष्ट भोजन यासह विविध शैक्षणिक सोयी-सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत