एसटी महामंडळाच्या लातूर विभागात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर

एसटी महामंडळाच्या लातूर विभागात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर लातूर, दि. १६ (जिमाका): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण व्हावे, या उद्देशाने एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात 'प्रवासी राजा दिन' आणि 'कामगार पालक दिन' आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या अनुषंगाने लातूर विभागातील आगारांसाठी या उपक्रमाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार लातूर विभागातील या उपक्रमाची सुरुवात १७ जून २०२६ रोजी औसा आगारातून होणार असून, त्यानंतर २४ जून रोजी उदगीर, १ जुलै रोजी निलंगा, ८ जुलै रोजी अहमदपूर आणि २२ जुलै २०२६ रोजी लातूर आगार येथे या विशेष मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे. या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संबंधित आगारात एकाच दिवशी दोन सत्रांत हा उपक्रम राबविला जाणार असून, पहिल्या सत्रात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत 'प्रवासी राजा दिन' आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्वसामान्य प्रवासी, विविध प्रवासी संघटना, तसेच शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी होऊन आपल्या बस सेवेसंबंधीच्या अडीअडचणी, तक्रारी आणि सुधारणांसाठीच्या सूचना लेखी स्वरूपात संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडू शकतील. प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत 'कामगार पालक दिन' राबविण्यात येणार असून, यामध्ये एसटी कर्मचारी आणि कामगार संघटनांचे प्रश्न ऐकून घेत कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न, रजा मंजुरी, कर्तव्याचे वेळापत्रक आणि प्रशासकीय कारवाई यांसारख्या तक्रारी व अडीअडचणींचे तात्काळ निराकरण केले जाणार आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत