विधान परिषद निवडणुकीनिमित्त लातूर जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद
विधान परिषद निवडणुकीनिमित्त
लातूर जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद
लातूर, दि. १६ (जिमाका): उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात चार दिवस मद्यविक्री बंद राहील. निवडणूक खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मद्य विक्री बंदीचे आदेश जारी केले आहेत.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील कलम १३५ (सी) आणि महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये देण्यात आलेल्या या आदेशानुसार, मंगळवार, १६ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपासून पुढे मद्य विक्री बंद राहील. तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवार, १७ जून २०२६ रोजी संपूर्ण दिवस, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी म्हणजेच गुरुवार, १८ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी, सोमवार, २२ जून २०२६ रोजी मतमोजणीच्या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण संपेपर्यंत मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हा आदेश लातूर जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी होत असलेल्या सर्व संबंधित क्षेत्रांना लागू राहणार आहे. यामध्ये लातूर महानगरपालिका हद्दीसह रेणापूर, अहमदपूर, जळकोट, चाकूर, उदगीर, शिरूर अनंतपाळ, देवणी, औसा आणि निलंगा या सर्व नगर पंचायत हद्दींचा समावेश आहे. या सर्व नमूद क्षेत्रांमध्ये स्थित असलेल्या सर्व देशी आणि विदेशी मद्याची घाऊक व किरकोळ विक्री, तसेच ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४ क्लब अनुज्ञप्ती, सीएल-२, सीएल-३, टिओडी-३, टिडी-१ इत्यादी सर्व प्रकारची दुकाने) या आदेशित कालावधीत पूर्णपणे बंद राहतील.
सर्व संबंधित मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे पालन करण्यात कोणत्याही प्रकारची कसूर झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार संबंधितांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
*****
Comments
Post a Comment