कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांचे
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
· नवविवाहित दाम्पत्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य
लातूर, दि. २३: सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागासवर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र) नवविवाहित दाम्पत्यांसाठी शासनाच्या वतीने 'कन्यादान योजना' राबविण्यात येते. या योजनेसाठी लातूर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी किमान १० दाम्पत्यांचे (२० वधू-वर) परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतींमध्ये लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे.
२ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबवली जात असून, १८ जुलै २०२४ च्या सुधारित शासन निर्णयान्वये या योजनेअंतर्गत लाभार्थी नवविवाहित दाम्पत्याच्या बँक खात्यात थेट २५ हजार रुपये अनुदान जमा केले जाते, तसेच हा सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही शासनाकडून प्रति जोडपे ४ हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते. त्याअनुषंगाने, लातूर जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी किमान १० दाम्पत्यांचे (२० वधू-वर) परिपूर्ण प्रस्ताव तीन प्रतींमध्ये लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांच्या कार्यालयात सादर करावेत. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
****
Comments
Post a Comment