मे अखेरपर्यंत कारखाने चालवून लातूर जिल्हयातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे
मे अखेरपर्यंत कारखाने चालवून
लातूर जिल्हयातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे
जिल्हा प्रशासन, साखर आयुक्त व
साखर कारखान्यांचे व्यवस्थापन यांच्या संयुक्त बैठकीत पालकमंत्री मंत्री अमित
देशमुख यांचे निर्देश
•जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे
नियोजन करावे
•सभासद व बिगस सभासद भेद न करता सर्वांचा
ऊस गाळप व्हावा हे पहावे
•सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील बंद होत
असलेल्या कारखान्यातील यंत्रणा मागवून घ्यावी
•जिल्ह्यात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार
नाही असा शेतकऱ्यांना दिलासा दयावा
लातूर,दि.13 (जिमाका)- लातूर जिल्ह्यातील
साखर कारखान्यानी जवळपासच्या गावांची परस्परात विभागणी करून घेऊन जलद ऊस गाळपाचे नियोजन
करावे मे अखेर पर्यंत कारखाने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करावे, असे निर्देश
राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित
विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवार
दि. 12 मे 2022 रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्ह्यात आज अखेर गाळपा
अभावी शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या संदर्भाने जिल्हा प्रशासन, साखर आयुक्तालय व सहकारी
तसेच खाजगी साखर कारखान्याच्या व्यवस्थापना सोबत संयुक्त आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील
साखर कारखान्याची गाळप क्षमता, आजपर्यंत झालेले गाळप, सद्या शिल्लक असलेला ऊस, ऊसतोडणी
यंत्रणेची सद्यस्थिती या संदर्भाने चर्चा झाली. जिल्ह्यात आणखी सभासद व बिगर सभासद
मिळून जवळपास 3 लाख मे. टन ऊस शिल्लक असल्याची माहिती यावेळी समोर आली.
यावेळी झालेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख
म्हणाले, सर्व साखर कारखाने यांनी जवळपासची गावे विभागून घेऊन जलद गाळपासाठीचे नियोजन
करावे, ऊसतोडणी करतांना सभासद व बिगर सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा या दृष्टीने पहावे, सोलापूर व नांदेड जिल्ह्यातील
बंद होत असलेल्या कारखान्यातील यंत्रणा तातडीने
मागवून घ्यावी, शेजारी जिल्ह्यात बंद होत असलेल्या कारखान्यात हार्वेस्टरचे अधिगृहन
करावे, लातूर जिल्हाधिकारी यांनी नांदेड व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून तोडणी
यंत्रणेच्या अधिगृहना बाबत कार्यवाही करावी, कारखान्याला होणारा पाणीपुरवठा सुरळीत
राहण्यासाठी महावितरणने अखंड वीजपूरवठा करावा, जिल्ह्यात कोणाचाही ऊस शिल्लक राहणार
नाही असा शेतकऱ्यांना दिलासा दयावा, ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता
घ्यावी, शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण करणाऱ्या अफवा पसरवल्या जाणार नाहीत याची
विशेष काळजी घ्यावी आदी निर्देश या बैठकीवेळी संबंधितांना त्यांनी दिले.
अधिक काळ कारखाने चालवल्यामूळे कारखान्याचे
होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने साखर ऊतारा घट आणि ऊस वाहतुकीसाठी
अनुदान दिले जाणार असल्याचे सांगून ऊसतोडणी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी नांदेडमध्ये
राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण व सोलापूर जिल्ह्यात आमदार बबनदादा
शिंदे यांना आपण स्वता बोलणार असल्याचे यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी म्हटले.
या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, विभागीय
सहसंचालक साखर, जिल्हा उपनिबंधक सहकार, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य
उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, मारूती महाराज सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, रेणाचे व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, विलास सहकारी
साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय
देशमुख, विलास कारखाना कार्यकारी संचालक संजीव देसाई, रेणा कारखाना कार्यकारी संचालक
मोरे, टवेन्टिवन शुगसचे कार्यकारी संचालक समीर सलगर, विलास कारखाना युनीट -2 कार्यकारी
संचालक ए.आर.पवार, जागृती कारखाना कार्यकारी संचालक सुनील देशमुख, संत मारूती महाराज
कारखाना कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, सिध्दी शुगरचे कार्यकारी संचालक होनराव, कार्यकारी
संचालक साई शुगर, शेतकी अधिकारी कल्याणकर, जहागीरदार, जाधव, मिलीद पाटील आदी संबंधित
विभागाचे अधिकारी सर्व कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment